पाच हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट: जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कृषि योजनांचा आढावा

अलिबाग,(जिमाका)दि.14-  फलोत्पादनासाठी  रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाव असून यावर्षी पाच हजार हेक्टर क्षेत्रावर नवीन फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवून फळबाग क्षेत्र वाढवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.
जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी रायगड जिल्ह्यातील कृषि,आत्मा व कृषि सलग्न्  विभागांचा नुकताच आढावा घेऊन जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, रोहयो उपजिल्हाधिकारी श्रीमती पी.एस. जैतू, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडुरंग सिगेदार, व 'आत्मा' प्रकल्प संचालक मंगेश डावरे, तसेच कृषि,आत्मा,वनविभाग, पशुसंवर्धन,मत्स्य व्यवसाय, दुग्धविकास व जलसंधारण विभागाचे जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी, प्रगतशील शेतकरी , स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, शेतकरी उत्पादन कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
 यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी  कृषि विभागामार्फत  राबविण्यात येणाऱ्या फलोत्पादन अभियान व फळबाग लागवड योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच मुख्यमंत्र्यांनी गेल्या महिन्यात गटशेतीसाठी एक कोटी रुपयापर्यंत अर्थसहाय्य देण्याची व गटशेतीस प्रोत्साहन व चालना देण्याची महत्वकांक्षी योजना जाहीर केली आहे.  त्यानुसार यंदा जिल्ह्यात सेंद्रीय भात, सेंद्रीय भाजीपाला,निर्यातक्षम आंबा व प्रक्रीया याबाबत गटशेतीचे प्रस्ताव प्रत्येक तालुक्यातून सादर करावे, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यासाठी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, कृषि क्षेत्रातील योगदान असलेले शेतकरी यांनी सहभागी व्हावे असे आवाहनही केले.

           'आत्मा' अंतर्गत विविध योजना,जलयुक्त शिवार व पाणलोट  विकास कार्यक्रम, पिकविमा योजना याबाबतही  या बैठकीत आढावा घेण्यात आला.  जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र वाढविण्यासाठी भातपीक निघाल्यावर अंगओलितावर किंवा सिंचन सुविधा उपलब्ध असतील तेथे रब्बी हंगामात कडधान्य पिकाचे क्षेत्र दुप्पट करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच जलयुक्त ‍शिवार व ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान या दोनही राज्य शासनाच्या महत्वकांक्षी धोरणांवर भर द्यावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज