पर्यटनवृद्धीसाठी स्थानिकांचा सहभाग आवश्यक- जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी

अलिबाग, दि.13 ( जिमाका)-  रायगड जिल्ह्यात पर्यटनासाठी अमाप संधी आहेत. मात्र या संधीचे पर्यटन व्यवसायवृद्धीत रुपांतर करण्यासाठी स्थानिकांचा सहभाग आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे केले.

 जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक, टूर ऑपरेटर्स,  पर्यटन केंद्र चालक आदींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्यासह महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे एशियन डेव्हल्पमेंट बॅंकेचे उपसंचालक समन्वयक जितेंद्र रायसिंघानी,  प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन  सुरज नाईक,  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे  प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण,  बंदर अधिक्षक अरविंद सोनवणे तसेच हॉटेल व्यावसायिक संघटनांचे पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  यावेळी हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या समस्या जिल्हाधिकाऱ्यांपुढे मांडल्या. त्यानंतर  बोलतांना जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले की,  जिल्ह्यात सध्या केवळ शनिवार रविवार अनेक पर्यटक येत असतात. पर्यटकांचा हा गट येत असतांनाच अन्य प्रकारच्या पर्यटन संधींची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचवून  पर्यटकांचा अन्य प्रकारचा गट जो अधिक दिवस येथे वास्तव्य करेल, येथील ऐतिहासिक स्थळांना भेटी देईल, येथील समुद्र किनाऱ्यांसोबतच पर्वत भ्रमंतीसही प्राधान्य देईल, अशा वेगवेगळ्या गटात पर्यटक येतील यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यासाठी व्यापक प्रमाणावर प्रचार प्रसिद्धी, स्थानिक लोकांचे सुक्ष्म कौशल्य विकास प्रशिक्षण, स्थानिकांच्या सहभागातून स्वच्छता व सुरक्षितता यासारख्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.  तसेच पर्यटनाची स्थानिक सर्किट्स विकसित करणे आवश्यक आहे. त्यातूनच पर्यटन विकासाला चालना मिळेल. यावेळी ते म्हणाले की, जिल्ह्यातील रस्त्यांच्या विकासासाठी आवश्यक अनेक बाबींची पूर्तता झाली असून लवकरच त्या कामास वेगाने सुरुवात होईल. त्यामुळे चांगले दळणवळण उपलब्ध होईल. तसेच हॉटेल व्यावसायिकांच्या अन्य समस्या मार्गी लावू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज