भात पिकावरील किडरोग सल्ला


सध्या भात पिक फुलोरा ते कापणी अवस्थेत आहे. लष्करी अळी किंवा तुडतुडे प्रादुर्भाव आढळल्यास खाली प्रमाणे फवारणी करावी. ही फवारणी करतांना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. भात पीक 90ते 95 टक्के तयार होताच वैभव विळ्याने जमीनीलगत कापणी करावी पावसाचा अंदाज पाहून कापणी करावी व पिक सुरक्षित ठिकाणी ठेवावे.
भात पिकावरील किड रोग सल्ला प्रकल्पांतर्गत सर्वेक्षणानुसार‍ किड रोग नियंत्रण बाबत सल्ले (ॲडव्हायजरी) वेळोवेळी ग्रामपंचायत कार्यालय वार्ताफलक, वृत्तपत्राद्वारे व विविध कार्यक्रमाद्वारे प्रसिद्धी देण्यात येत आहे.
लष्करीआळी- या किडीच्या अळया दिवसा पानाच्या फुटव्यात अथवा जमिनीत लपून राहतात आणि रात्री पाने खातात. पाने कडे पासून ते मध्यशिरेपर्यंत खात असल्यामुळे नुकसानी वरुन कीड चटकन ओळखून येते.किडीचा खरा उपद्रव मात्र पिक काढणीच्यावेळी होतो. या किडीच्या अळ्या लोंब्या कुरडतात त्यामुळे दाणे जमिनीवर गळून नुकसान होते.
नियंत्रणाचे उपाय-पिक तयार होताच कापणी करावी. चार ते पाच अळ्या प्रती चौ.मी. आढळताच संध्याकाळच्या सुमारास मिथिल पॅराथीऑन  दोन टक्के भुकटी 8 किलो प्रति एकर धुरळावी. भाताची कापणी झाल्यानंतर नांगरट करुन धसकटे वेचून नष्ट करावीत.नांगरणी केल्यामुळे  किडीच्या सुप्तावस्था प्रखर सुर्यप्रकाशामुळे तसेच पक्षांमुळे नष्ट होतात. अळीचे संक्रमण रोखण्यासाठी शेताच्या बाजुला दोन फुट खोल चर खणावेत.शेताच्या बांधावरील गवत काढावे. शेतातील बेडूक मारु नयेत. कारण बेडूक हा या किडीचा नैसर्गिक शत्रू आहे. प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्रात मागे नमूद केल्याप्रमाणे किटकनाशकांपैकी कोणतेही एक औषध योग्य प्रमाणात धुरळावी. धुरळणी दिवसा न करता सायंकाळी     अथवा पहाटे करावी. त्यामुळे बाहेर पडणाऱ्या अळ्या नष्ट होतात.
तुडतुडे- हि किड ज्या जमिनीत पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात होत नाही आणि जेथे नत्र खतांच्या मात्रा वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात दिल्या जातात त्या ठिकाणी प्रामुख्याने आढळून येते मादी तुडतुडे त्यांची पिल्ले भाताच्या खोडातील अन्नरस शोषून घेतात परिणामी भाताची पाने  पिवळी पडतात.आणि पूर्ण रोप वाळते. विशेषत: शेताच्या मध्यभागी ठिकठिकाणी तुडतुड्यांनी करपून गेलेले भाताचे पिक दिसते. अशा रोपांमधून ओंब्या बाहेर पडत नाहीत जरी पडल्याच तर दाने पोचट होतात.
कीड नियंत्रणासाठी किड प्रादुर्भावावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.जर एका बुध्यावर 5 ते 10 तुडतुडे असतील तर किटकनाशकांचा वापर करावा. फवारणीद्वारे 10 लिटर पाण्यातून सिफेट 75टक्के 14 मिली किंवा कार्बारील 50टक्के 40 ग्रॅम किंवा फिप्रोनिल 5टक्के 20मिली किंवा इमिडाक्लोरोप्रिड 17.8 टक्के 2 मिली फवारावे. किटकनाशकाचा फवारा बुंध्यावर पडेल याची दक्षता घ्यावी.
शेतात पक्षी थांबे. प्रकाश सापळे,कामगंध सापळे याद्वारे किडींचे नियंत्रण चांगल्या प्रकारे होऊ शकते.
भात पिक कापणीनंतर गवताच्या नायनाट करावा. भात कापणी करतांना वैभव विळ्याचा वापर करावा. किडीचे वेळीच नियंत्रण केल्यास निश्चितच होणारे नुकसान टाळता येणे शक्य आहे.
भात कापणीची योग्य वेळ- भात कापणीची वेळ ही भरडणीसाठी महत्वाची ठरते. भात पीक कापणी झाल्यानंतर जास्त् दिवस शेतात ठेवल्यास भरडणी नंतर तांदळाच्या तुटीचे प्रमाण जास्त् होते.कारण दिवसाचे वाढते तापमान व रात्रीचे कमीत कमी तापमान तसेच त्यावर पडलेले दवबिंदू या तफावतीमुळे भात दाण्यास तडा जातो. त्यामुळे भरडणी नंतर तांदळाच्या तुटीचे प्रमाण वाढते.यासाठी भात जातीची योग्य् वेळी म्हणजे लोंबीतील 90 ते 95 टक्के दाणे पक्व् झाल्यानंतर आणि लोंबीतील काही दाणे पिवळसर हिरवट असतांना कापणी करावी. कापणी नंतर त्यांच किंवा दुसऱ्या दिवशी मळणी करावी. ओला पेंढा स्वतंत्र वाळवावा.
नियंत्रित वाळविणे- कापणीनंतर  भात नियंत्रित परिस्थितीत उन्हाखाली किंवा यंत्राच्या सहाय्याने वाळवावा.अतिशय कडक तापमानात दाण्याच्या पृष्ठभागावरील आर्द्रता तेवढया कमी कालावधीत पृष्ठभागावरील तापमान दाण्यातील आर्द्रता या तापमानातील तफावतीमुळे दाण्याला तडे जातात व अशाप्रकारे वाळविलेले दाणे भरडणी करतांना हमखास तुटतात.
भरडणी करतेवेळी भातातील पाण्याचे प्रमाण- भरडणीवेळी दाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण दाण्याच्या बळकटीच्या गुणधर्माच्या व्यस्त असते.जेवढे भातातील आर्द्रतेचे प्रमाण जास्त तेवढा दाणा जास्त कमकुवत असतो. अशा प्रकारचा भात सहज तुटतो. साधारणत: भात भरडतांना भातामध्ये 21 ते 14 टक्के आर्द्रता प्रमाणे असणे आवश्य्क असते. जर यापेक्षा भातात आर्द्रतेचे प्रमाण कमी असेल तर भरडणीवेळी भात दाणा साफ होतो व परिणामत: तुटीचे प्रमाण कमी होते.
भाताची योग्य साठवण- गोदामात भाताची साठवणूक करत असतांना भातावरील आर्द्रतेचे प्रमाण 12 ते 14 टक्के असणे आवश्यक असते जर यापेक्षा आर्द्रतेचे प्रमाण जास्त् असेल तर भातास बुरशी लागण्याची शक्यता असते.अशा परिस्थितीत किडीच्या बुरशीच्या उपद्रवामुळे भातास इजा होते. त्यामुळे भात भरडल्यानंतर कणीचे प्रमाण वाढते. तसेच गोदामातील भात साठवला असतांना आर्द्रतेचे प्रमाण व तापमान अतिशय जास्त तफावत असते. अशा वेळीही भातास तडा जातो. त्यामुळेही भात भरतांना कणीच्या प्रमाणात वाढ होते.असेखोपोली येथील उपविभागीय कृषि अधिकारी पांडूरंग सिगेदार यांनी कळविले आहे.
- संकलनः जिल्हा माहिती कार्यालय, रायगड- अलिबाग
00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक