जिल्हा ग्रंथोत्सव 2017 : जगण्यासाठी महत्वाचे ते ते वाचावे- कवी अशोक नायगांवकर : रायगड जिल्हा ग्रंथोत्सवाचे थाटात उद्घाटन, ग्रंथ दिंडीने झाली सुरुवात









अलिबाग, जि. रायगड, दि.22(जिमाका)- ग्रंथोत्सवाचे आयोजन हे युवकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी आहे. युवकांसमोर पुढचा काळ हा परीक्षेचा काळ आहे. जगण्याच्या या स्पर्धेत आपले जीवन जगण्यासाठी सुकर करतांना वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान, तंत्र आत्मसात करावे लागते, ते सगळे ग्रंथामध्येच उपलब्ध आहे. त्यामुळे जगण्यासाठी जे जे महत्त्वाचे आहे ते ते युवकांनी वाचाचे, असा हितोपदेश ज्येष्ठ कवि अशोक नायगांवकर यांनी आज येथे दिला.
 रायगड जिल्हा ग्रंथोत्सव 2017 च्या उद्घाटनप्रसंगी ते आज अलिबाग येथे आले होते. त्यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जेएसएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती रेश्मा पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी ध.बा. वळवी, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष नागेश कुलकर्णी, उपशिक्षणाधिकारी कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रंथदिंडीने झाली सुरुवात
आज सकाळी साडेनऊ वा. सरखेल कान्होजी आंग्रे समाधीपासून ग्रंथदिंडीने ग्रंथोत्सवाच्या आयोजनास सुरुवात झाली. अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते ग्रंथपूजन करुन ग्रंथ दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गावरुन ही ग्रंथदिंडी कार्यक्रम स्थळी पोहोचली. या दिंडीत ज्येष्ठ साहित्यिक अशोक नायगांवकर यांनीही आपला सहभाग दिला. यावेळी शालेय विद्यार्थिनींचे लेझीम पथक दिंडीच्या अग्रभागी होते.  या दिंडीत जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय पाटील व  सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष ॲड.गौतम पाटील, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष नागेश कुलकर्णी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी वळवी  यांची उपस्थिती होती.
जेएसएम विधी महाविद्यालयात ग्रंथोत्सवाचे थाटात उद्घाटन
 जिल्हा ग्रंथोत्सवाचे शहरातील जेएसएम महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले असून  कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते  दीपप्रज्वलन करुन या ग्रंथोत्सवाचे विधीवत उद्घाटन करण्यात आले. यावेळी  जिल्हाधिकारी डॉ. विजय सूरवंशी हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते.
आपल्या भाषणात श्री. नायगावकर म्हणाले की, ग्रंथोत्सवानिमित्त आयोजित ग्रंथदिंडीत भारताचे संविधान हा ग्रंथ ठेवून त्याची मिरवणूक काढण्यात आली, ही मोठी आनंदाची बाब आहे. भारताचे हे संविधान ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केले त्यांना हे ज्ञान संपादन करण्यात ग्रंथांचीच मोलाची मदत झाली. ग्रंथवाचन हे ज्ञानसंपादनाचे सर्वात मोठे स्त्रोत आहे. त्यामुळेच आपले संविधान हे इतके सर्वसमावेशक आहे की, आजही भारताची अखंडता आणि एकात्मता ही संबंध विश्वासाठी आश्चर्याचा विषय ठरली आहे. मराठीजनांनी ग्रंथवाचन करुन विविध ज्ञानशाखांमधील ज्ञान संपादन करावे आणि जगभर मराठीचा झेंडा फडकवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रत्येक गावात ग्रंथालय उभारण्याचा संकल्प- जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी
 रायगड जिल्ह्यात केवळ 75 सार्वजनिक ग्रंथालये आहेत. जिल्ह्यातील गावांच्या संख्येच्या तुलनेत ही संख्या खूप नगण्य असून या ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यातील प्रत्येक गावात ग्रंथालय उभारण्याचा संकल्प आपण सारे मिळून करु या, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.  ते म्हणाले की, आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करायचा असेल तर ग्रंथवाचनाशिवाय पर्याय नाही.  अलिकडे उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सला ग्रंथ वाचनाची सर नाही. नव्या पुस्तकांचा वास ही सुद्धा आनंददायी बाब असते, असे सांगुन डॉ. सूर्यवंशी यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणीना उजाळा दिला.  ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी  ग्रंथवाचनावर भर दिला पाहिजे.  वाचनात आपण समरसता अनुभवतो.  आयुष्यात चांगले यश मिळवायचे असेल तर विद्यार्थी दशेतच वाचनाची सवय अंगिकारली पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयातील ग्रंथालयात अधिकाधिक वेळ घालवला पाहिजे.
प्रत्येक गावात ग्रंथालय उभारण्याचा संकल्प करतांना  ग्रंथ देणगी ही संकल्पना राबवून प्रत्येक गावात ग्रंथालय उभारण्यासाठी आपण सारे प्रयत्न करु या,    असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
यावेळी प्राचार्य डॉ. अनिल पाटील, प्राचार्य ॲड. रेशमा पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करुन ग्रंथांचे मानवी जीवनातील महत्त्व उपस्थितांना सांगितले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन के. डी. पाटील यांनी तर आभार प्रदर्शन तंत्र सहाय्यक अजित पवार यांनी केले. कार्यक्रमास अलिबाग शहरातील ग्रंथप्रेमी नागरिक, विद्यार्थी विद्यार्थिनी, पत्रकार, वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रंथदालनाचे उद्घाटन
ग्रंथोत्सवानिमित्त जेएसएम महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या ग्रंथदालनाचे उद्घाटनही कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  सर्व मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर श्री. नायगावकर व उपस्थित मान्यवरांनी  ग्रंथ दालनांना भेटी देऊन ग्रंथ पाहणी केली.
लोकराज्य स्टॉलला वाचकांचा  प्रतिसाद
 ग्रंथोत्सवाच्या ग्रंथदालनात  जिल्हा माहिती कार्यालय, रायगडच्या वतीने लोकराज्य स्टॉल उभारण्यात आला आहे. या स्टॉलला उपस्थित वाचकांनी प्रतिसाद दिला. याठिकाणी लोकराज्य अंक विक्री, प्रदर्शन व वर्गणीदार नोंदणीची सुविधा वाचकांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या स्टॉलला कवी अशोक नायगावकर यांनी भेट दिली. प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी त्यांचे स्वागत केले. लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक जयंत धुळप, प्राचार्य रेशमा पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
०००००
गुरुवार दि.23 रोजीचे कार्यक्रमः-
सकाळी 11 वा.  परिसंवादः 'ग्रंथांनी मला काय दिले?' अध्यक्ष -जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, सहभाग- पोलिस अधिक्षक अनिल पारसकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, जिल्हा कोषागार अधिकारी फ़िरोज मुल्ला, पेण येथील उपजिल्हाधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड.
दुपारी साडेतीन वा. मैत्र फाऊंडेशनच्या वतीने 'समाज विकास व वाचनसंस्कृती' या विषयावर पथनाट्य.
दुपारी चार वा. परिसंवादः 'माध्यमे आणि वाचनसंस्कृती'. अध्यक्ष कोकण विभागीय  माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे. सहभाग- दैनिक कृषीवल चे संपादक प्रसाद केरकर, दैनिक पुढारी चे संपादक शशीकांत सावंत, दैनिक लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक जयंत धुळप,  दैनिक लोकसत्ताचे हर्षद कशाळकर, सुधागड एज्युकेशन  सोसायटी, कुरुळ  येथील मुख्याध्यापिका श्रीमती सुजाता पाटील  तसेच मान्यवर माध्यम प्रतिनिधी.
सायं. सहा वा. समारोपाच्या सत्रात जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी  यांच्या हस्ते  पारितोषिक वितरण.

०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत