ध्वजदिन निधी संकलन हे राष्ट्रीय कार्य-जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी
सशस्त्र सेना ध्वजदिन 2017 निधी संकलन शुभारंभ
माजी नौदल प्रमुख ॲडमिरल एल. रामदास यांची विशेष उपस्थिती
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.8- प्रत्येकाच्या मनात देशाबद्दल
आदर्शाची कल्पना असते, जर आदर्श भारत बघायचा असेल तर तो सैन्यात जाऊन बघावा. या जिल्ह्याला
लढवय्या विरांची मोठी परंपरा आहे. अशा लढवय्या विरांसाठी आणि त्यांच्या कुटूंबियांच्या
कल्याणासाठी ध्वजदिन निधी संकलन केले जाते. जिल्ह्यातील प्रत्येक विभागाने आणि नागरिकांनी
हे स्वतःचे कर्तव्य समजून या राष्ट्रीय कार्यास सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी
डॉ. विजय सूर्यवंशी यांनी
केले.
रायगड जिल्ह्याचा
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2017 संकलन शुभारंभ कार्यक्रम आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या
राजस्व सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी
यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला.
यावेळी माजी नौदल प्रमुख ॲडमिरल एल. रामदास यांची विशेष उपस्थिती होती. सदर कार्यक्रमात पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शेषराव
बडे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, उपविभागीय
अधिकारी सर्जेराव सोनवणे, अलिबाग तहसिलदार प्रकाश सपकाळ, राज्य मार्ग परिवहन महामंडळ
पेण विभाग नियंत्रक विजय नवनाथ गिते, तसेच जिल्ह्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि
माजी सैनिक, वीर नारी, पत्रकार आदी मान्यवरांनी आपला सहभाग नोंदवला.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते
दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी दोन मिनिटे मौन राखुन हुतात्म्यांना
श्रध्दांजली वाहिली. जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी माजी नौदल प्रमुख ॲडमिरल एल.
रामदास यांचे स्वागत केले. जिल्हा सैनिक कल्याण
अधिकारी मेजर प्रांजळ प्र. जाधव (नि.) यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
प्रास्ताविकात मेजर प्रांजळ प्र. जाधव
यांनी माहिती दिली की, रायगड जिल्ह्याकरीता ध्वजदिन निधी 2017 संकलनाकरीता 60 लक्ष
98 हजार 400 रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तसेच या संकलित ध्वजदिन निधीमधून युध्द
विधवा, अपंग सैनिक, आजी-माजी सैनिक
व त्यांच्या विधवांना तसेच अवलंबितांना सैनिक कल्याण विभाग व राज्य शासनामार्फत
राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी विषयक विविध आर्थिक मदत दिल्याची माहिती दिली. सन
2016-17 या वर्षात जिल्ह्याच्या कल्याणकारी
निधीमधून, आर्थिक मदतीपोटी (वैद्यकीय, शैक्षणिक, चरितार्थ, अंत्यविधी, मुलीचे लग्न)
- अशा 326 लाभार्थीना एकूण 16 लाख 90
हजार 122 रुपये तसेच दुसऱ्या महायुद्धामधील
230 लाभार्थ्यांना प्रतिमाह तीन
हजार रुपये प्रमाणे एकूण 83 लक्ष 24 हजार रुपये इतके अनुदान, तसेच 01 एप्रिल 2017
पासून आज पावेतो 51 लक्ष 24 हजार रुपये इतका
निधी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग मार्फत वाटप
करण्यात आला आहे.
त्यानंतर विशेष गौरव पुरस्कार लाभार्थी, व्यावसायिक शिक्षण आर्थिक मदतीचे लाभार्थी,
सामाजिक दायित्व दर्शविलेले दानशूर व्यक्ती व सन 2016 निधी संकलनात बहुमोल कामगिरी
करणारी कार्यालये/ संस्था यांचा जिल्हाधिकारी डॉ.
विजय सूर्यवंशी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निवृत्त
नौदल प्रमुख ॲडमिरल रामदास यांनीही आपले मनोगत याप्रसंगी व्यक्त केले.
दरवर्षी एक लाख रुपये ध्वजदिन
निधीस मदत करणारे ॲड. प्रविण ठाकूर, समाजसेविका श्रीमती सुलभा अनंत लोंढे-जोशी, श्रीमती
शोभा शशिकांत फाटक यांचा जिल्हाधिकारी डॉ. विजय
सूर्यवंशी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
सौ.किरण करंदीकर यांनी केले व आभार
प्रदर्शन सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी दुर्गादास हंसराज पेवाल यांनी केले.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
Comments
Post a Comment