खांदेश्वर येथे 23 ते 27 फेब्रुवारी दरम्यान जिल्हा कृषि महोत्सव


         अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29- शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी चालना देणे,नवीन कृषि तंत्रज्ञानाची ओळख करणे, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि शेतकरी यांच्यात विचारविनिमय घडविणे, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री संकल्पनेवर आधारीत धान्य, फळे, भाजीपाला आदी विक्रीची सुविधा करणे यासाठी जिल्हा कृषि महोत्सवाचे आयोजन 'आत्मा' प्रकल्पाअंतर्गत करण्यात येते. यंदा रायगड जिल्ह्यातील कृषि उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी 23 ते 28 फेब्रुवारी दरम्यान खांदेश्वर ता. पनवेल येथे जिल्हा कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आढावा सभेचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शेळके,  उपजिल्हाधिकारी  (रोहयो) विश्वनाथ वेटकोळी, प्रकल्प संचालक आत्मा मंगेश डावरे, कर्जत संशोधन केंद्राचे डॉ. एल.एस. चव्हाण,  व्ही.आर. साळवे, उपविभागीय कृषि अधिकारी पांडुरंग शिगेदार आदी उपस्थित होते. यावेळी  सदर महोत्सव हा दि.23 ते 28 फेब्रुवारी दरम्यान खांदेश्वर  येथे रेल्वेस्टेशन जवळील मैदानावर आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले. या ठिकाणी 200 स्टॉल्स राहतील. या स्टॉल्स मध्ये कृषि यंत्रे, साधने, शासकीय विभागांची माहिती देणारे स्टॉल्स,  शेतकऱ्यांसाठी शास्त्रज्ञांसमवेत चर्चा सत्रे, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाची थेट खरेदी करण्यासाठी ग्राहकांना सुविधा आदी व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच पशुसंवर्धन विभागासाठीही स्टॉल्स उपलब्ध करुन उत्तम जनावरांचे प्रदर्शन, पशुखाद्य, दुग्धव्यवसायासाठी आवश्यक यंत्रसामुग्रीचे प्रदर्शन, माहिती देण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पादन मोठ्याप्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी एक चांगली संधी म्हणून या महोत्सवाकडे पाहिले पाहिजे. त्यासाठी अधिकाधिक लोकांपर्यंत हा महोत्सव पोहोचविला पाहिजे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी व ग्राहक यात सहभागी होतील यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देशही यावेळी डॉ. सूर्यवंशी यांनी दिले.

००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज