प्लास्टिक बंदी योजना कोकण विभागीय बैठक : प्लास्टिक बंदीसाठी व्यापक जनजागृतीवर भर- ना. रामदास कदम



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18- प्लास्टिक बंदीसाठी कायदा प्रस्तावित आहे.त्याद्वारे प्लास्टिक बंदी होण्याआधी जनजागृतीवर भर द्यावा, लोकांचे प्रबोधन  करून प्लास्टिक बंदी व्हावी, यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावे,असे निर्देश राज्याचे पर्यावरण मंत्री ना.रामदास कदम यांनी आज येथे दिले.
प्लास्टिक बंदी राज्यात येत्या गुढीपाडव्यापासून प्रस्तावित आहे.त्या अनुषंगाने कोकण विभागीय बैठक आज ना.रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली येथील हॉटेल मॅपल आयव्हीवाय मधील सभागृहात पार पडली. याबैठकीस  महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन, प्रभारी विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभय यावलकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  विवेक होमणकर, ठाणे येथील निवासी उपजिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कूटे  तसेच विभागातील महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांचे अधिकारी उपस्थित होते.
ना. कदम म्हणाले की, राज्यात प्लास्टिक बंदी करण्यासाठी  शासन कायदा करत  आहे. देशातील अन्य 17 राज्यात ही बंदी आहे. मात्र प्लास्टीक बंदी चा कायदा होण्याआधीच जनतेचे प्रबोधन करुन स्वयंस्फूर्तीने प्लास्टिक मुक्ती, व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत. त्यासाठी सर्व विभागीय पातळ्यांवर बैठकांचे आयोजन करुन, अंमलबजावणी यंत्रणांशी विचारविनिमय करण्याचे आमचे धोरण आहे. त्यादृष्टीने राज्यात सर्व विभागांत अशा बैठका घेऊन अधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आलीत.  अशाप्रकारे व्यापक पातळीवर मते जाणून घेऊन तयार केलेला हा पहिलाच कायदा असेल, असेही ना. कदम यांनी सांगितले.
प्लास्टीक बंदी करण्यासाठी आपण सकारात्मक विचाराने अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा. बंदी करतांना लोकांना प्लास्टिक ऐवजी अन्य पर्याय देणे, प्लास्टिक बंदी करण्याबाबत प्रबोधन करणे, तसेच प्लास्टीक बंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या महापालिका, नगरपालिका आदींना प्रोत्साहनपर पारितोषिके देणे यापद्धतीने अंमलबजावणी केली जाईल असेही ना. कदम यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कायदा होण्याआधी लोकांमध्ये जनजागृती करुन प्लास्टिक बंदी व्हावी, अशी अपेक्षा यावेळी ना. कदम यांनी व्यक्त केली.
 या कायद्याच्या व्यापक सहमतीसाठी ज्या ज्या उद्योगात प्लास्टिकचा वापर होतो उदा. प्लास्टिक बाटलीबंद पाणी, दुध व्यावसायिक आदींशी शासन चर्चा करत आहे.  येत्या 26 जानेवारी रोजीही यासंदर्भात विद्यार्थ्यांना शाळांमधून शपथ देण्यात येणार आहे. जेणे करुन हा संदेश मुलां, अशी माहितीही ना. कदम यांनी यावेळी दिली.
यावेळी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन यांनी प्रास्ताविक तर आभार प्रदर्शन व सूत्रसंचलन संजय भुस्कुटे यांनी केले. या बैठकीनंतर ना. कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज