रस्ते विकासाचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करा-प्रधान सचिव आशिषकुमार सिंह


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.9:- राज्याच्या आर्थिक विकासाकरीता रस्त्यांचा विकास करणे गरजेचे असून त्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राज्यस्व सभागृहात आयोजित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत आज दिले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, अधिक्षक अभियंता नवी मुंबई गोपीनाथ मोहिते, कार्यकारी अभियंता महाड विश्वनाथ सातपुते, कार्यकारी अभियंता अलिबाग राहुल मोरे, कार्यकारी अभियंता पनवेल आर.आर.पाटील तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रधान सचिव आशिषकुमार सिंह म्हणाले की, राज्याच्या आर्थिक विकासाकरीता रस्त्यांचा विकास करणे गरजेचे आहे. रस्ते विकासाचे प्रस्ताव सादर करताना, रस्त्याची पाहणी करावी, योग्य नियोजन करुन रस्ते विकासाला किती निधी लागणार आहे या बाबींचा विचार करुन प्रस्ताव सादर करावा. नंतरच निधी वितरीत करण्यात येईल. निधीचे योग्य नियोजन करुन जिल्ह्यातील जे खराब रस्ते आहेत त्यांचे काम करावे. रस्त्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे झाले पाहिजे.  राज्यातील रस्त्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. सर्वांनी एकत्र येऊन परिवर्तन करण्याची गरज आहे. तेव्हाचे जिल्ह्यातील  रस्त्यांचे चित्र बदलेल. तसेच एखादा रस्ता चांगला असेल तर त्यावर व्यर्थ निधी खर्च करु नये. भविष्यात जर रस्ते विकासाचे योग्य नियोजन केले तर 100 टक्के लांबी पूर्ण होऊ शकते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभाग योग्य नियोजन करुन रस्त्यांची कामे करणार असेल तर जिल्हा प्रशासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल.

0000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज