राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प रायगड जिल्ह्यातील प्रस्तावित कामांचा आढावा


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.8:-राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पाअंतर्गत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने करावयाच्या रायगड जिल्ह्यातील प्रस्तावित कामांचा आज जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आज ही बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांचे समवेत आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सहसचिव अरुण उन्हाळे, अवर सचिव श्रीरंग घोलप, तसेच जागतिक बँक पथकाचे एम.ए.दशरक्षी, वेंकटक विनोदकुमार गौतम, आशिष बोधले, पी गोपाल कृष्णन, शिरीष कुलकर्णी, सी.एम.मिश्रा, एस.पी.स्वामी, एम.ए. भोसले, खारभुमी विभागाचे उपअभियंता एस.जे.शिरसाठ, महावितरणचे माणिकलाल तपासे, सागर पाठक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी माहिती देण्यात आली की, राष्ट्रीय चक्री वादळ धोके निवारण प्रकल्पात राज्यातील समुद्र किनारी असलेल्या शहरांचा व जिल्ह्यांचा समावेश आहे. यात कोकणातील अलिबाग, जि.रायगड, रत्नागिरी आणि सातपाटी जि.पालघर या ठिकाणी  प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. या संबंधित शहरात भुमिगत विद्युत वितरण प्रणाली, खार बंधारे बांधणे आणि बहु उद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्र उभारणे या कामांचा समावेश आहे.
रायगड जिल्ह्यात किहिम ता.अलिबाग दिघी ता.श्रीवर्धन, बोर्ली ता.मुरुड या ठिकाणी बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे. तर नारवेल बेनवले, मोराकोठा, कोकेरी ता.पेण, काचळी पिटकरी,फणसापूर-कुर्डूस ता.अलिबाग, नांदगांव-माझगांव ता.मुरुड या ठिकाणी खारभुमी बंधारे बांधण्याचे प्रस्तावित आहे.
तसेच अलिबाग शहर, वरसोली, चेंढरे सह येथील विद्युत वितरण प्रणाली भुमिगत करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. एकूण कोकण विभागातील कामांची 397 कोटी 85 लक्ष रुपयांची ही योजना आहे. अशी माहिती ही यावेळी देण्यात आली आहे.
या संदर्भात बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्यासाठी जागांची मोजणी करुन रेखांकन करणे, आवश्यक प्रमाणपत्रे मिळवणे, खार बंधाऱ्यांसाठी शेतकऱ्यांची संमतीपत्र प्राप्त करणे आदी कामे संबंधित यंत्रणांनी करावीत असे निर्देश यावेळी देण्यात आले.    

0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक