जिल्ह्यात 103 दरडप्रवण गावे; जनजागृती मोहिमेस प्रारंभ रचनात्मक, अरचनात्मक उपयायोजनांच्या अंमलबजावणीचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15- जिल्ह्यात 103 गावे दरड प्रवण असल्याबाबत भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग यांनी दिलेला अहवाल जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला असून येत्या पावसाळ्याच्या आत या गावांमध्ये जनजागृती मोहिम राबविण्यासाठी गावातील सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, मुख्याध्यापक, , शिक्षक आदींचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. तसेच भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने शिफारस केल्यानुसार दरडप्रवण क्षेत्रात रचनात्मक, अरचनात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.
जुलै 2005 मध्ये दरड कोसळून झालेल्या आपत्तीच्या अनुभवावरुन सदर सर्वेक्षण भारतीय भुवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने केले आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला आहे. धोक्याच्या पातळीनुसार जिल्ह्यातील 9 गावे ही वर्ग 1 ( अतिधोकेदायक) , 11 गावे वर्ग 2 मध्ये तर उर्वरित 83 गावे ही वर्ग 3 या श्रेणीत समाविष्ट करण्यात आली आहेत.  ही गावे तालुकानिहाय या प्रमाणे आहेत. त्यात महाड तालुक्यात 49, पोलादपुर तालुक्यात 15, रोहा तालुका 13, म्हसळा-6, माणगाव 5, सुधागड, खालापूर, कर्जत, पनवेल प्रत्येकी 3, तर श्रीवर्धन तालुक्यात 2 आणि तळा तालुक्यात 1 अशी एकूण 103 गावे दरडप्रवण आहेत.  या गावांतील लोकांना प्रशिक्षित करण्यासाठी दि. 16 रोजी रोहा येथे, दि.17 रोजी माणगाव येथे, दि.18 रोजी महाड येथे तर दि.19 रोजी पोलादपूर येथे  प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जाणार आहे. यात गावचे सरपंच, पोलिस पाटील, ग्रामस्थ, मुख्याध्यापक, शिक्षक,  तलाठी, ग्रामसेवक इ. मिळून एकूण 515 लोकांना प्रशिक्षित केले जाणार आहे. हे लोक गावात जाऊन गावकऱ्यांना प्रशिक्षित करतील आणि आपत्ती प्रसंगी करावयाचे नियोजन सांगतील.
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार दरड कोसळण्यास अतिवृष्टी हे एक महत्त्वाचे कारण असून कमी वेळेत 500 मि.मी पेक्षा जास्त पाऊस झाल्यास दरड कोसळण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे दरडग्रस्त गावातील नागरिकांनी जवळच्या महसूल मंडळस्तरीय पर्जन्यमापक यंत्रावरील दैनंदिन पावसाच्या नोंदीची माहिती घेऊन अतिवृष्टी होत असल्यास स्थलांतरीत व्हावयाचे आहे. दरडप्रवण गावांमधील डोंगर उताराकडील बाजूस डोंगर कापण्याचे काम करु नये, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पाणी वाहुन नेणाऱ्या मार्गातील अडथळे दूर करावे, पावसाळी हंगामात जमिनीस भेगा पडणे, अस्थिर भूभाग असणे यावर लक्ष ठेवून जनजागृती करणे, डोंगर उतारावरील मोठे दगड हटवणे ही कामे तात्काळ सुरु करण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचे यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक