जवान प्रथमेश कदम यांचे पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.17-  भारतीय सैन्य दलात सेवा बजावित असताना शहीद झालेल्या शेवते ता. महाड या गावातील लष्करी जवान प्रथमेश दिलीप कदम यांच्या पार्थिवावर शेवते येथील वैकुंठ भूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांनी साश्रूनयनांनी 'प्रथमेश कदम अमर रहे' अशा घोषणांनी या शूर सुपुत्राला अखेरचा निरोप दिला.
शेवते ता. महाड या सैनिकी परंपरा असलेल्या गावच्या कदम कुटुंबातील प्रथमेश कदम हे मध्यप्रदेशातील भोपाळ येथील थ्री-ईएमई युनिट मध्ये कार्यरत होते. शनिवार दि. 12 मे रोजी भोपाळ येथे रेल्वेमार्गावर सैनिक दलामार्फत बचाव कार्य करतांना अपघात होऊन ते गंभीर जखमी झाले होते. दिल्लीतील लष्करी रुग्णालयात उपचार सुरु असताना मंगळवार दि.15 मे रोजी त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव लष्करी विमानाने मुंबई येथे गुरुवारी पहाटे आणण्यात आले. तेथून लष्कराच्या वाहनातून सकाळी शेवते यागावी त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. शेवते येथील वैकुंठ स्मशानभूमीत शहीद प्रथमेश कदम यांच्या पार्थिवावर भारतीय सैन्य दलातर्फे थ्री ईएमई सेंटर भोपाळ युनिटचे सुभेदार मेजर आर.बी.तांबे, हवालदार एस ए काशीद, शिपाई खांडेकर, शिपाई भालेकर, हवालदार अमोल जाधव,  मुंबई युनिटचे मेजर नरेश कुमार यांनी पुष्पचक्र अर्पण करुन मानवंदना दिली. तसेच पोलीस दलातर्फेही मानवंदना देण्यात आली. जिल्हा प्रशासनातर्फे महाडचे तहसिलदार चंद्रसेन पवार, महाड एम.आय.डी.सी.चे पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयातर्फे डी.एच.पेवाल, तसेच आमदार भरतशेठ गोगावले, माजी आमदार माणिकराव जगताप या मान्यवरांनीही आदरांजली वाहिली. या अंत्यविधीस तालुक्यातून मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज