स्थानिक तरुणांना नोकरीची संधी; कृती आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी




अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.24- जिल्ह्यात स्थापित व कार्यरत असणाऱ्या उद्योगांत स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी जिल्ह्यातील उद्योजकांना लागणारे कौशल्यपूर्ण मनुष्य बळाची आवश्यकता लक्षात घेऊन त्यानुसार जिल्ह्यातील तरुणांना प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील जिल्हा उद्योग केंद्र, कौशल्य विकास, स्वयंरोजगार व उद्योजकता विकास विभाग यांनी संयुक्तपणे कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे दिले.
जिल्ह्यात रोजगार व स्वयंरोजगार मेळावे आयोजन करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली  कार्यबल समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती देवराज, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक निंबेकर, जिल्हा रोजगार स्वरोजगार, कौशल्य व उद्योजकता विकास विभागाचे सहाय्यक संचालक एस. जी. पवार तसेच उद्योजक संघटनांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
स्थानिक तरुणांना उद्योजकांच्या आवश्यकतेनुसार प्रशिक्षित करुन त्यांना मनुष्यबळ उपलब्ध  करुन देता येईल, यातून स्थानिकांना रोजगार संधीही उपलब्ध होईल. यासाठी www.mahaswayam.in  या संकेतस्थळावर युवक युवतींसाठी नाव नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे.  यात नोंदविलेल्या माहितीच्या आधारे  जिल्ह्यातील उद्योग घटकांना नियोजित मेळाव्यात निमंत्रीत करावे, अशी माहिती देण्यात आली.
जिल्ह्यातील अधिकाधिक तरुणांना स्थानिक उद्योगात रोजगाराची संधी मिळावी यासाठी जिल्हा उद्योग केंद्र,  जिल्हा रोजगार स्वरोजगार, कौशल्य व उद्योजकता विकास विभाग तसेच उद्योजक संघटना यांनी परस्परांच्या आवश्यकतांच्या माहितीचे आदान प्रदान करुन जिल्ह्यासाठी कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी दिले.
00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत