जिल्हास्तरीय बँक समन्वय समिती बैठक : बँकांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे : जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांचे निर्देश



अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.24-  जिल्ह्यातील एकूण खातेधारक शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेता पिक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या खूप कमी आहे. शेतकऱ्यांना हंगामात योग्य वेळी पतपुरवठा झाल्यास त्याचा योग्य विनियोग करुन ते त्यांच्या पिक उत्पादनात वाढ करु शकतात. तरी बँकांनी स्वत:हून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे व त्यांना पतपुरवठा करावा. असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी आज येथे‍ दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय बँक समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी अध्यक्षस्थानी उपस्थित होते.  यावेळी रिजर्व बँकेचे समन्वयक एम.मून, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक ए.एम.निंबेकर, बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रिय व्यवस्थापक सी.के.पिनाते, नाबार्डचे सुधाकर रघतवान, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राचे संचालक विजयकुमार कुलकर्णी, जिल्हा उपनिबंधक पी.एम.खोडका तसेच सर्व बँकांचे  जिल्हास्तरीय प्रमुख उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, शासन विविध योजनांमार्फत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वाढविणे, रोजगार-स्वयं रोजगाराला चालना देणे, ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करणे यासारख्या उपाययोजना राबवित आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी या सर्व योजनांना बळकटी देण्यासाठी जिवनोन्नती व रोजगार निर्मिती क्षेत्राला पतपुरवठा वाढवावा. बँकांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता यावे यासाठी महसूल यंत्रणे मार्फत खातेधारक शेतकऱ्यांची माहिती बँकांना देण्यात येईल. त्यानुसार बँकांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांपर्यंत पिक कर्ज योजनेची माहिती व लाभ पोहोचवावा  असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी आज येथे दिले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी सर्व योजनांमध्ये बँक निहाय केलेल्या वित्त पुरवठ्याचा आढावा घेतला. त्यात पिक कर्ज योजना, स्वयंसहाय्यता बचत गटांना अर्थ सहाय्य, महिला सक्षमीकरण योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना, बिज भांडवल योजना या सारख्या योजनांचा समावेश होता. या योजना स्वयं रोजगार निर्मिती,  आर्थिक स्वावलंबन या सारख्या उद्दिष्ट पूर्तीसाठी राबविण्यात येत आहेत. तेव्हा या क्षेत्राला अर्थ पुरवठा वाढविण्यासाठी बँकांनी शेतकरी व बेरोजगारांपर्यंत पोहोचावे असे आवाहन डॉ.सूर्यवंशी यांनी केले. जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक निंबेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत