फेक न्यूजः परिणाम आणि दक्षता आधी सत्यता तपासा, मगच फॉरवर्ड करा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यांचे आवाहन


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) 1-  ‘फेक न्यूज’ म्हणजेच बनावट बातम्या या हेतूपुरस्कर पसरवल्या जातात. त्यासाठी समाज माध्यमांचा वापर केला जातो. समाज माध्यमे हे एकमेकांशी संवाद साधण्याची माध्यमे आहेत. आणि अधिकृत माहितीची माध्यमे ही वृत्तपत्रे. वृत्तवाहिन्या व त्यांचे अधिकृत वेब पोर्टल्स आदी आहेत. सोशल मिडीयाला माहितीचे माध्यम समजून गल्लत करु नका. तेव्हा सोशल मिडीया वरील माहितीची सत्यता तपासा मगच फॉरवर्ड करा, याबाबत जनजागृती करा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यांनी आज माध्यम प्रतिनिधींना येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय, जिल्हा सायबर सेल आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फेक न्यूजः परिणाम आणि दक्षता’ या विषयावर  सर्व माध्यम प्रतिनिधींसाठी  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात कार्यशाळेचे आयोजन आज  करण्यात  आले.
या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर (भापोसे) तर प्रमुख अतिथी म्हणून कोकण विभागीय उपसंचालक (माहिती) डॉ. गणेश मुळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा ग्रंथालय अधिकारी धरमसिंग वळवी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी  उपस्थित मान्यवरांचे पुस्तक देऊन स्वागत केले.
त्यानंतर  सोशल मिडीया महामित्र स्पर्धेतील राज्यस्तरावर पोहोचलेल्या आशिष मोहन गावडे, जयेश हरीभाऊ माने, प्रथमेश रमेश सरक या विजेत्यांना  मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
प्रास्ताविकात उपसंचालक डॉ.मुळे म्हणाले की,  समाजात हेतू पुरस्कर पसरविल्या जाणाऱ्या फेक न्यूज माध्यम कर्मींनी ओळखून त्यावर वेळीच पायबंद घालता यावा या हेतूने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. फेक न्यूज निर्मिती आणि त्याचा प्रसार हा समाजमाध्यमांद्वारे होत असल्याने त्याचा प्रसार वेगाने होतो. त्यामुळे याबाबत ही माध्यमे वापरणाऱ्यांमध्ये जागरुकता असणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन डॉ. मुळे यांनी केले. प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी विषयाचे सादरीकरण केले तर सायबर सेल मार्फत पीएसआय शिवसांब स्वामी यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  व आभार प्रदर्शन डॉ. मिलिंद दुसाने यांनी केले. या कार्यक्रमाला अनुलोमचे रविंद्र पाटील तसेच सोशल मिडीया महामित्र विजेते आशिष मोहन गावडे, जयेश हरीभाऊ माने, प्रथमेश रमेश सरक यांच्यासह सर्व माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेच्या आयोजनासाठी  सायबर सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव, पोलीस उपनिरीक्षक शिवसांब स्वामी, जिल्हा माहिती कार्यालयाचे विठ्ठल बेंदूगडे, सचिन राऊत, शशीकांत भोसले आदींनी परिश्रम घेतले.
00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत