इंडिया पोस्ट पेमेंट बँक घरापर्यंत बँकसेवा पोहोचवून पोस्टाचं नातं होणार अधिक दृढ -ना.अनंत गिते



अलिबाग,जि.रायगड दि.1 (जिमाका)- देशभरात पोहोचलेल्या पोस्टाच्या  1 लाख 55 हजार टपाल कार्यालयाच्या विस्तीर्ण शाखांमार्फत ग्रामीण जनतेशी जोडलेले टपाल विभागाचे नाते इंडिया पोस्ट पेमेंट बँकद्वारे बँकसेवा थेट घरापर्यंत पोहोचवून अधिक दृढ होईल, असा विश्वास केंद्रीय अवजड उद्योग मंत्री ना.अनंत गिते यांनी आज येथे व्यक्त केला.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या शुभारंभानिमित्त अलिबाग येथील मुख्य पोस्ट ऑफीस येथे आयोजित समारंभात ना.गिते बोलत होते. यावेळी आ.सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲङ आस्वाद पाटील, नवी मुंबई विभागाच्या पोस्टमास्तर जनरल शोभा मधाळे, अलिबाग पोस्ट ऑफीस अधिक्षक व्ही.सी.घोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.   यावेळी ना.गिते यांच्या हस्ते इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या विशेष कव्हरचे अनावरण करण्यात आले.  तसेच बँकेच्या खातेधारकांना क्यू आर कोड कार्डचे  वितरणही करण्यात आले.
आपल्या संबोधनात ना.गिते म्हणाले की, इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करुन घरापर्यंत बँकसेवा पोहोचविण्याचा प्रशंसनीय प्रयत्न आहे.  या बँकेसेवेमुळे ग्रामीण भागातील जनतेला तंत्रज्ञानाची ओळख तर होईलच शिवाय ग्रामीण जनतेला बँके व्यवस्थेशीही जोडण्यात  मदत होईल.  ज्येष्ठ नागरिकांसारख्या समाज घटकांना बँक सेवेचा लाभ घरबसल्या मिळेल, असा विश्वास ना.गिते यांनी व्यक्त केला.  या शिवाय या बँकेमुळे टपाल विभागाचा चेहरा-मोहरा बदलेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी आ.सुभाष उर्फ पंडितशेट पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करुन इंडिया पोस्ट पेमेंट बँक सेवेचे स्वागत केले.  नवी मुंबई विभागाच्या पोस्ट मास्तर जनरल शोभा मधाळे आपल्या मनोगतात म्हणाल्या की, अलिबाग येथे मुख्य शाखा व चार उपशाखा आज सुरु होत आहेत.  येत्या डिसेंबर अखेर तीनशे ठिकाणी ही सुविधा उपलब्ध होईल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अलिबाग शाखा प्रबंधक वैभव कावरे यांनी केले.    मिलिंद पाटील यांनी आभार प्रदर्शन व सुत्रसंचलन केले.  यावेळी अनेक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.  या कार्यक्रमाप्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे होत असलेल्या मुख्य सोहळ्याचे थेट प्रसारण दाखविण्यात आले.
00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत