सुधारित वृत्त : बोर्ली मांडला येथे आज जिल्हा प्रशासनातर्फे त्सुनामी आपत्ती व्यवस्थापनाची रंगित तालीम
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.3- त्सुनामी या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या सरावाचा भाग
म्हणून मंगळवार दि.4 रोजी जिल्ह्यात बोर्ली मांडला ता. मुरुड येथे जिल्हा
प्रशासनातर्फे रंगित तालीम राबविली जाणार आहे. या रंगित तालीम मध्ये जिल्हा
प्रशासनाचे तब्बल 18 विभाग सहभागी होणार आहेत.
राष्ट्रीय पातळीवर मंगळवार
दि. 4 रोजी पश्चिम किनारपट्टीवरील जिल्ह्यात
हे सराव सत्र राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने त्सुनामी रंगीत
तालीम(मॉक ड्रिल) आढावा बैठक आज बोर्ली मांडला ता.मुरुड येथे जिल्हा परिषद शाळेत पार पडली. यावेळी मुरूड तहसीलदार उमेश पाटील बोर्ली सरपंच नौशाद
दळवी,मांडला सरपंच सुचिता पालवणकर,जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने,मुरूड
आगार प्रमुख युवराज कदम,रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव
बंडगर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत जगताप,मुरूड गटविकास अधिकारी आर.ओ.
भागवत आदी विविध विभागांचे अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना माहिती देण्यात आली
की, राष्ट्रीय
आपत्ती व्यस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली व
भारतीय राष्ट्रीय समुद्रीय माहिती सेवा केंद्र, हैदराबाद (Indian National
Center for Ocean
Information Service Hyderabad ) यांच्या मागदर्शनाखाली दि.4 रोजी
पश्चिम किनाऱ्यावरील सर्व राज्यामध्ये त्सुनामी
विषयक रंगीत तालीम होणार आहे. यासाठी रायगड जिल्ह्यात बोर्ली
मांडला ता. मुरुड या गावात हे सराव सत्र राबविण्यात येणार आहे. यामध्ये त्सुनामी
संदर्भातील जिल्ह्यातील सर्व यंत्रणाची तयारी व समन्वय व त्या अनुषंगाने घ्यावयाची
दक्षता हा या रंगीत तालमीचा उद्देश आहे. या सरावामध्ये जिल्ह्यातील जिल्हास्तरीय
नियंतत्रण कक्ष, तालुकास्तरीय कक्ष, गाव पातळीवरील नियंत्रण कक्ष व शासनाचे सर्व
विभाग सहभागी होणार आहेत
अशी होईल रंगित तालीम-
हैदराबाद येथील संस्थेतुन
सकाळी अकरा वाजता पहिला त्सुनामी संदर्भात पहिला संदेश हा मंत्रालयातील नियंत्रण
कक्षात येईल तेथून त्या संदेशाचे वाचन होऊन हा संदेश जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षात तेथून
मुरूड तहसील कार्यालयातील नियंत्रण कक्षात तेथून मांडला येथील नियंत्रण
कक्षात हा संदेश येईल.त्यानंतर बोर्ली गावात भोंगा(सायरन)वाजविला जाईल आणि
स्वयंसेवकांमार्फत सूचना दिली जाईल.अशा प्रकारचे दिवसात पंधरा संदेश प्राप्त होतील.यावेळी
स्थलांतर झालेल्या नागरिक,जनावर यांची नोंद केली जाणार आहे.त्याचप्रमाणे या ठिकाणी
रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येणार आज.त्याचप्रमाणे जनावराचे लसीकरण ही केले
जाईल.
भूकंप, महापूर, चक्रीवादळ अतिवृष्टि ह्या सर्व घटना
नैसर्गिक आपत्तीमध्येच मोडणाऱ्या आहेत. अशा आपत्तीमध्ये होणारी जीवित व वित्त हानी
टाळण्यासाठी महाराष्ट्र आपत्ती जोखीम व्यवस्थापना अंतर्गत विभागीय व जिल्हास्तरावर
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.
हा कार्यक्रम प्रशासकीय यंत्रणेकडून राबविला जात
असला तरी देखील संकटकालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे,असे
यावेळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे सागरकुमार पाठक यांनी सांगितले.
नागरी संरक्षण दलाचे मनोहर
म्हात्रे यांनी सांगितले की, आपत्ती काळात तसेच आपत्तीनंतर विशेषत: अल्पवयीन
बालके, वृध्द, महिला तसेच अपंग यांना सुरक्षित स्थळी हलवणे तसेच पाणी पुरवठा,
जनावरांना चारा, खानपान व्यवस्था, वैद्यकीय सेवा, औषध सामग्री, सांडपाण्याची
व्यवस्था इत्यादी सुरळीत चालतील. याची खात्री करण्यासाठी स्थानिक पातळीवर आपत्ती
व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. त्यासाठी तितकाच उत्स्फूर्तपणे लोकसहभाग मिळणे आवश्यक
ठरते.
बोर्ली सरपंच नौशाद दळवी
यांनी सांगितले की, आपत्ती येथे तेव्हा ती सांगून येत नाही तसेच जातपात किंवा गरीब
श्रीमंत असे पाहत नाही गावात येणारे महापूर वा अन्य नैसर्गिक संकटाचा मुकाबला
करण्यासाठी सुरुवातीला गावकऱ्यांनाच हिमतीने सज्ज राहावे लागते. नागरिकांचे मनोबल
वाढविण्यासाठी स्थानिक पातळीवर व्यवस्थापनाची गरज निर्माण होते. आपत्तीला सहज बळी
पडणाऱ्या वर्गाचे रक्षण करण्यासाठी, आपत्तीनंतर दैनंदिन जीवन उध्वस्त होऊ नये याची
तयारी करावी लागते.
या उपक्रमा
करीता दि. 31 ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय आढावा बैठक झाली होती तसेच सर्व संबंधित
विभागप्रमुखांना रंगीत तालीमचे प्रशिक्षण देण्यात आले होते. जिल्हास्तरीय आढावा
बैठक दि.1 रोजी झाली होती.सदरचा उपक्रम हा केवळ रंगीत तालीम असल्याने कोणतीही अफवा
पसरवू नये तसेच जनतेने घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. भरत शितोळे
यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment