जिल्ह्यात 2 नोव्हेंबर रोजी दाखल होणार‘लोहयात्रा’ : जनसामान्यांपर्यंत आहाराबाबत माहिती पोहोचवा- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1- भारतीय अन्न व मानके प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या वतीने जनसामान्यांमध्ये आहार व पोषणाबाबत जनजागृती करण्यासाठी देशभर लोहयात्रा या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यात  2 ते 8 नोव्हेंबर या कालावधीत ही सायकल रॅली ‘लोह यात्रा’ दाखल होणार आहे. या रॅलीमार्फत  जिल्ह्यातील जनतेपर्यंत  आहार व पोषणाबाबत माहिती पोहोचवा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ सूर्यवंशी यांनी आज येथे दिले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त  भारतीय अन्न व मानके प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या वतीने  योग्य आहार अर्थात ‘Eat Right India’ ही चळवळ राबविण्यात येणार आहे. मुख्यत्वे आहार व पोषणाविषयक जनसामान्यांमध्ये जनजागृती हे या चळवळीचे उद्दिष्ट्य आहे. त्यासाठी ‘लोह यात्रा’ या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. ही यात्रा दि.16 ऑक्टोबर ते 26 जानेवारी 2019 या कालावधीत संपूर्ण देशात जाणार आहे.  या आयोजनात केंद्र शासनाचे सांस्कृतिक मंत्रालय, स्वच्छ भारत मिशन, पोषण अभियान, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय व अन्य विभाग सहभागी होत आहेत. ही लोह यात्रा रायगड जिल्ह्यातून दि.2 ते 8 नोव्हेंबर या कालावधीत मार्गक्रमण करणार आहे.
 या यात्रेच्या  नियोजनासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित विभागांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस अन्न औषध प्रशासन विभागाचे कोकण विभागाचे सह आयुक्त शि.स. देसाई, सहाय्यक आयुक्त दि. तु.संगत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई,  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल हेमांगिनी पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण श्रीमती पवार तसेच  अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी माहिती देण्यात आली की, लोह यात्रा ही सायकल रॅली जिल्ह्यात पोलादपुर येथे दि.2 नोव्हेंबर रोजी दाखल होईल तेथे दि.3 नोव्हेंबर रोजी  जनजागृती कार्यक्रम, दि.5 नोव्हेंबर रोजी गोरेगाव येथे तर दि.7 नोव्हेंबर रोजी नागोठणे येथे  जनजागृती कार्यक्रम होऊन यात्रा वाशीकडे रवाना होईल.
 या यात्रेचे नियोजन योग्य पद्धतीने करुन अधिकाधिक लोकांपर्यंत आहार व पोषण विषयक माहिती पोहोचवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी दिले.
00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज