कृषी विभाग आढावा बैठकः भातशेती दुरुस्तीची कामे मनरेगातून घ्यावीत- जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश


अलिबाग,जि. रायगड, दि.26,(जिमाका)- जिल्ह्यात कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना एकात्मिक पद्धतीने शेती करण्याबाबत चालना द्यावी. तसेच भात शेतीच्या दुरुस्तीची कामे ही महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून घेण्यात यावी, जेणे करुन शेतकऱ्याला या कामांचा मोबदला मिळेल, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी (दि.25) सायंकाळी दिले.
कृषि विभागाच्या आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी उपवनसंरक्षक मनिषकुमार, जिल्हाअधिक्षक कृषि अधिकारी पी.बी शेळके, आत्मा प्रकल्प उपसंचालक एस.एच. बोऱ्हाडे, उपजिल्हाधिकारी रोहयो मठपती तसेच सर्व उपविभागीय व तालुका कृषि अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी  परंपरागत कृषी तंत्रज्ञान विकास योजना (सेंद्रीय शेती) ,  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा), गटशेती प्रोत्साहन योजना, राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान, कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, आदर्शगाव संकल्प व प्रकल्प तसेच मागेल त्याला शेततळे योजना आदी योजनांचा व उपक्रमांचा आढावा घेतला.
यावेळी शेतकऱ्यांनी एकात्मिक शेतीकडे वळावे यासाठी कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना चालना द्यावी. तसेच यांत्रिकीकरणासाठी अधिकाधिक अवजारे बॅंक तयार करुन सर्व शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात अवजारे उपलब्ध करुन द्यावीत. शेतकऱ्यांना भात शेतीसाठी दुरुस्तीची कामे येत्या पावसाळ्याच्या आत करावी लागतात, त्यासाठी शेतकऱ्यांना ही कामे मनरेगा योजनेतून घेता येतील यासाठी शेतकऱ्यांना माहिती देऊन तसे प्रस्ताव तयार करुन पाठवा, असे निर्देश डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी दिले.

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज