पत्रकारितेचे स्वरुप बदलले मात्र महत्त्व कायम- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी


            अलिबाग, जि. रायगड, दि.16 (जिमाका)- डिजीटल युगात पत्रकारितेत अनेक बदल झाले असले तरी पत्रकारांनी बाळगावयाचे सामाजिक जबाबदारीचे भान तितकेच महत्त्वाचे आहे, त्यामुळेच पत्रकारितेचे महत्त्व टिकून आहे, असे प्रतिपादन जिल्हा सरकारी वकील ॲड. संतोष पवार यांनी आज येथे केले.
लोकशाही प्रणालीत असलेले पत्रकारितेचे स्वरुप डिजीटल क्रांतीमुळे बदलले असले तरी  महत्त्व मात्र
कायम आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अध्यक्षीय समारोप करतांना केले.
राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात ‘डिजीटल युगातील पत्रकारिताः आचारनिती आणि आव्हाने’ या विषयावर चर्चासत्राचे अयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी हे होते. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडुरंग शेळके, अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर, ज्येष्ठ पत्रकार जयपाल पाटील, विजय चवरकर, दैनिक रायगड टाईम्सचे संपादक राजन वेलकर, दैनिक लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक जयंत धुळप, ईनाडू दै. सामना राजेश भोत्सेकर, झी मिडीयाचे प्रफुल्ल पवार, नवाकाळच्या प्रतिनिधी सारिका पाटील, दै. पुढारीच्या सुवर्णा दिवेकर, छायाचित्रकार रमेश कांबळे, जितू शिगवण, दैनिक कृषिवलचे प्रमोद जाधव, टिव्ही 9 चे महेबुब जमादार, आयबीएनचे मोहन जाधव, सचिन पावशे तसेच पत्रकार बांधव
- भगिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी ‘लोकराज्य’ मासिकाच्या दीपोत्सव महाराष्ट्राच्या प्रगतीचा या विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलतांना ॲड. पवार म्हणाले की, पत्रकारिता हा लोकशाही प्रणालीचा महत्त्वाचा घटक आहे. केवळ बातमी हाच विषय नव्हे तर समाजातील विविध प्रश्नांवर चर्चा, विश्लेषण, विविध समस्यांचा मागोवा या गोष्टींचा उहापोह पत्रकारितेच्या माध्यमातून होत असतो. अशावेळी डिजीटल तंत्रज्ञानामुळे  वेगवान पत्रकारिता झाली आहे. हा फायदा असला तरी दुसऱ्या बाजूला पत्रकारांची सुरक्षितता, त्यांच्या उपजिविकेची अशाश्वतता यासारखे प्रश्न कायम आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे. डिजीटल युगात पत्रकारांनी स्वतःसाठी आचारसंहिता पाळणे आवश्यक आहे. समाज पत्रकारांवर विश्वास ठेवतो त्या सामाजिक जबाबदारीचे भान बाळगून पत्रकारांनी शहानिशा करुनच बातमी प्रसारीत करणे योग्य, असेही ॲड पवार यांनी सांगितले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात  जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले की, लोकशाही प्रणालीत असलेले पत्रकारितेचे स्वरुप डिजीटल क्रांतीमुळे बदलले असले तरी  महत्त्व कायम आहे. शासनानेही 275 प्रकारच्या सेवा या डिजीटल प्लॅटफॉर्मद्वारे उपलब्ध केल्या आहेत. डिजीटल तंत्रामुळे जसे जनसामान्यांचे जीवन सुकर झाले तसा त्याचा लाभ पत्रकारितेलाही झाला, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
ज्येष्ठ पत्रकार जयपाल पाटील यांचा जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला. तर कार्यक्रमाला उपस्थित सर्व पत्रकारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत जयंत धुळप, विजय चवरकर यांनी सहभाग घेतला. प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी केले.
00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत