अपंग दिनानिमित्त सोमवारपासून मतदान जनजागृती


अलिबाग, जि. रायगड, दि.1 (जिमाका)- जागतिक अपंग दिन (दि.3 डिसेंबर) चे औचित्य साधून भारत निवडणूक आयोगाने ‘सुलभ निवडणूका’ हे घोषवाक्य जाहीर केले असून त्यानुसार अपंग घटकांतील मतदारांना निवडणूक प्रक्रिया सुलभ करावी यासाठी सोमवार दि.3 पासून सप्ताहभर मतदान विषयक जनजागृती केली जाणार आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी आज दिली.
यासंदर्भात नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय रविकिरण पाटील, जिल्हा समाजकल्याण अधिकारी जी.एम.लेंडी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी,  जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सिंधू घरत, अपंग संघटनेचे प्रमुख साईनाथ पवार, प्रिझम संस्थेच्या तपस्वी गोंधळी आदी उपस्थित होते.
यावेळी निर्देश देण्यात आले की, दि.3 डिसेंबर रोजीच्या अपंग दिनानिमित्त मुख्य कार्यक्रम हा जिल्हास्तरीय अपंग मेळाव्यात घेण्यात येईल. हा कार्यक्रम भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालय, नीलिमा हॉटेलच्या मागे, श्रीबाग नं2 येथे सकाळी 11 वाजता होणार आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच या सप्ताहभर जिल्हास्तर, विधानसभा मतदारसंघ स्तर व मतदान केंद्र स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.  त्यात नवीन नोंदणी झालेल्या अपंग मतदारांना भारत निवडणूक आयोगाचे ‘मतदार असल्याचा अभिमान- मतदानासाठी सज्ज’ हे घोष वाक्य लिहिलेले बॅचेस देण्यात येतील.  शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अपंग मतदार नोंदणी तसेच आयोगाकडून अपंग मतदारांना  पुरविण्यात येणाऱ्या सोई सुविधांची माहिती देण्यात येणार आहे.ज्या संस्थांनी , व्यक्तींनी अपंगांसाठी चांगली कामगिरी केली अशा सर्वांचा सत्कारही यावेळी करण्यात येणार आहे. शिक्षण विभागाने आंतरशालेय परिसंवादांचे आयोजन करुन त्यातून अपंग मतदारांची नावनोंदणी, त्यांच्यासाठी असणाऱ्या मतदान केंद्रावरील सुविधा याबाबत माहिती देण्यात येईल,असे श्रीमती माने यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज