ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मतदान यंत्रांबाबत जनजागृती मोहिम यशस्वीपणे राबवा--उपजिल्हाधिकारी श्रीम.वैशाली माने



अलिबाग,जि. रायगड, दि.21:- आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट संदर्भात जनजागृती मोहिम जिल्ह्यात यशस्वीपणे राबवावी, असे निर्देश उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीम.वैशाली माने यांनी आज येथे दिले.   जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित ईव्हीएम व व्हीव्हीपॅट संदर्भात अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी मार्गदर्शन करताना श्रीमती. माने म्हणाल्या की, आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेप्रमाणे दि. 24 डिसेंबर 2018 पासून जिल्ह्यात ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे.  यासाठी पाच सदस्यांची एक टिम तयार करण्यात येऊन प्रत्येक दिवशी 4 प्रात्यक्षिके दाखविणे आवश्यक आहे.  ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक दाखविताना तेथे जास्तीत जास्त  नागरिक जमा होतील ते पहावे व प्रात्यक्षिक पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या काही अडीअडचणी असतील तर त्या सोडविण्याचाही प्रयत्न करावा.   स्ट्राँगरुममधून मशीन घेऊन जाताना तेथे पोलीस कर्मचारी उपस्थित असल्याशिवाय मशीन बाहेर नेण्यात येऊ नये असेही त्यांनी यावेळी सांगितले.  या मोहिमेसाठी लॉगबुकचा नमुना दिला जाईल त्यानुसार प्रत्येक टिमने लॉगबुक भरुन दिवसभरात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा.  कार्यक्रम सुरु करण्यापूर्वी मशीनची टेस्ट करुन नंतर ती नागरिकांना हाताळण्यासाठी देण्यात यावी.   या जनजागृती मोहिमेदरम्यान वापरण्यात येणारी मतदान यंत्रे व अधिकारी/कर्मचारी यांना पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरविण्याबाबत तहसिलदारांना  सूचना देण्यात आल्या.  तसेच या जनजागृती मोहिमेत सहभागी होऊन ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मतदान यंत्रांबाबत जास्तीत जास्त माहिती नागरिकांपर्यंत पोहचवावी  असे आवाहनही त्यांनी  यावेळी केले.
यावेळी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट संदर्भातील माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे उपस्थित महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना दाखविण्यात आली.  या प्रशिक्षणाला उपविभागीय अधिकारी, तहसिलदार तसेच  अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक