मनरेगातून गडकिल्ल्यांचे जतन संवर्धन अभिमान महाराष्ट्र योजनेची रायगड किल्ल्यावर घोषणा राज्यातल्या गडकिल्ल्यांना गतवैभव प्राप्त करुन देणार- ना. रावल
किल्ले रायगड,
ता.महाड, जि. रायगड, दि. 11 (जिमाका)- राज्यातील 450 हून अधिक गड किल्ल्यांचे जतन संवर्धन करण्यासाठी शिवभक्त
गड-दुर्गप्रमी प्रयत्नशिल असतात. त्यांच्या या प्रयत्नांना शासनाने मनरेगा अर्थात
रोजगार हमी योजनेची घोषणा आज दुर्गराज किल्ले रायगडावर राज्याचे पर्यटन व रोजगार
हमी योजना मंत्री ना. जयकुमार रावल यांनी केली. दुर्गराज किल्ले रायगडावर हत्ती
खाना परिसरात आज दुर्ग परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला राज्याचे
पर्यटन मंत्री ना. जयकुमार रावल. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदितीताई तटकरे,
राज्यसभा सदस्य तथा रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष युवराज संभाजीराजे,
सांस्कृतिक विभागाचे सचिव भूषण गगराणी, कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील,
विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, पोलीस
अधिक्षक अनिल पारस्कर, मनरेगा आयुक्त रंगनायक, पुरातत्व विभागाचे ए.के.सिंह, डॉ.
तेजस गर्ग, माजी आमदार माणीकराव जगताप, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसिलदार
चंद्रसेन पवार आदी अधिकारी तसेच शिवभक्त दुर्गप्रेमी उपस्थित होते.
यावेळी ना. रावल यांनी अभिमान महाराष्ट्रः गड किल्ले सवर्धन मोहिमङ या
योजनेची विधीवत घोषणा केली. तसेच कार्यक्रम स्थळीच शासन निर्णयाला मान्यता दिली.
या घोषणेचे उपस्थित दुर्गप्रेमी शिवभक्तांनी टाळ्यांचा कडकडाट करुन स्वागत केले.
उपस्थितांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष केला.
आपल्या भाषणात ना. रावल म्हणाले की, महाराष्ट्राला गड किल्ल्यांचा प्राचीन
इतिहास आहे. हा इतिहास शौर्य व स्वाभिमानाचा आहे. हा इतिहास उलगडून जगा पुढे
मांडुन गडकिल्ल्यांना गतवैभव प्राप्त करुन देऊ. गडकिल्ल्यांवरील विविध समस्या
सोडविणारे मावळे म्हणून आपण सारे एक होऊ. गड किल्ल्यांबद्दल संवेदनशिलता बाळगणारा
समाज निर्माण करु या. शिवभक्त दुर्गप्रेमींच्या गडकिल्ल्यांविषयीच्या तळमळीला आता
शासनाने मनरेगाच्या माध्यमातून हजारो हातांची साथ देऊ केली आहे. त्यासाठी अभिमान
महाराष्ट्र ही योजना जाहीर केली आहे. या योजनेत एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात
कामाला सुरुवात करुन, शंभर दिवसांचे काम करुन गडकिल्ल्यांचे संवर्धन करु. यातून गडकिल्ल्यांच्या
संवर्धनाची लोकचळवळ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की,
शासनाने रायगड संवर्धनासाठी 660 कोटी रुपये, सिंदखेडराजा साठी 25 कोटी रुपये निधी
दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जगातील सर्वात मोठे स्मारक ही शासन मुंबईत
उभारत आहे. या ऐतिहासिक स्थळांची वस्तूनिष्ठ माहिती लोकांना कळावी यासाठी पर्यटन
विभागामार्फत गाईड ट्रेनिंग अभ्यासक्रम राबविण्यात येईल, असेही ना. रावल यांनी
सांगितले.
खा. संभाजीराजे यांनी राज्यातल्या गडकिल्ले संवर्धनाच्या क्षेत्रातील सर्व
घटक एकत्र करुन त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेण्यासाठी दुर्ग परिषदेचे आयोजन
केले अशी भूमिका मांडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी
यांनी केले. यावेळी जि.प. अध्यक्ष आदितीताई तटकरे, माजी आमदार माणिकराव जगताप
यांनी ही आपले मनोगत व्यक्त करुन गडदुर्ग संवर्धन योजनेचे स्वागत केले. यावेळी
राज्यभरातून आलेल शिवभक्त, दुर्गप्रेमी उपस्थित होते.

00000
Comments
Post a Comment