प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाः शुक्रवारपर्यंत लाभार्थ्यांच्या याद्या पूर्ण करा- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांचे निर्देश
अलिबाग, जि. रायगड, दि.13 (जिमाका)- केंद्र
पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची
अंमलबजावणी करण्यासाठी दोन हेक्टर (पाच
एकर) पेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांची नावे संकलित करण्याचे काम
युद्धपातळीवर सुरु असून प्रत्येक महसूली गावातून ही माहिती गोळा करुन येत्या
शुक्रवार दि.15 पर्यंत या याद्या पुर्ण कराव्या,असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी
आज येथे दिले.
प्रधानमंत्री
किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची
माहिती गोळा करण्याच्या कामाचा आज जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज आढावा
घेतला. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण
पाणबुडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके, जिल्हा उपनिबंधक पांडुरंग
खोडका तसेच उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी,
सहा. निबंधक आदी उपस्थित होते.
सद्यस्थितीत
या योजनेच्या अंमलबजावणीत लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरु आहे.
दि.4 फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार दि.15 फेब्रुवारीपर्यंत या याद्या पूर्ण
करावयाच्या आहेत. प्रत्येक महसूली गावात तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांनी या
याद्या पूर्ण करावयाच्या आहेत. तसेच
शेतकऱ्यांनीही आपले बॅंक पासबुक, आधार कार्ड, मोबाईल क्रमांक आदी माहिती द्यावयाची
आहे. प्रत्येक शेतकऱ्याने आपली माहिती ही संबंधित तलाठी यांच्याकडे द्यावी, असे
आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी केले. यावेळी माहिती देण्यात आली की, रायगड
जिल्ह्यात 1983 महसूली गावे असून 2 हेक्टर
(5 एकर) पेक्षा कमी क्षेत्र असणारे कुटूंब 4 लाख 31 हजार 4 इतके असून आतापर्यंत 1436 गावांमधील 91 हजार 999
कुटूंबांची माहिती संकलित झाली आहे.
या
कामाचा तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष उपविभागीय
अधिकाऱ्यांनी दररोज घ्यावा. तहसिलदार, तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी
यांनी सर्व गावांना भेटी देणे आवश्यक
असल्याचेही डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितले.
Comments
Post a Comment