दर्जेदार सेवा हा ग्राहकांचा हक्क -जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी



अलिबाग,जि.रायगड,दि.24 (जिमाका) - ग्राहकांना चांगल्या व दर्जेदार सेवा मिळाव्यात यासाठी ग्राहकांच्या हितासाठी ग्राहक संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यात येते.  ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळावी हा त्यांचा हक्क आहे. यासाठी त्यांच्या तक्रारींचे निराकरण होणे आवश्यक असून त्यासाठी ग्राहक चळवळीतील शासकीय व अशासकिय सदस्यांनी प्रभावीपणे काम करण्याची गरज आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले.  राज्य परिवहन आगार अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिन-2019 निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 
यावेळी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष रविंद्र नगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, तहसिलदार सचिन शेजाळ, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडूरंग शेळके, सहाय्यक नियंत्रक वैधमापन शास्त्र रामसिंग राठोड,  जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, विभाग नियंत्रक श्रीम.अनघा बारटक्के आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, ग्राहकांसाठी असलेला ग्राहक संरक्षण कायदा काय आहे त्यामध्ये कोणकोणत्या तरतूदी आहेत यांची ग्राहकांना माहिती व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  ग्राहकांची पिळवणूक व फसवणूक होऊ नये यासाठी ग्राहकांनी कोणतीही वस्तू खरेदी करताना ती योग्य रितीने तपासून घेणे आवश्यक आहे. यासाठी ग्राहक हा नेहमी जागरुक असला पाहिजे.   ऑनलाईन माध्यमातून होणाऱ्या खरेदी मधून अनेकदा ग्राहकांची फसवणूक होते. त्याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे.  ग्राहक संरक्षण कायदा हे ग्राहकाच्या झालेल्या फसवणूकीला न्याय मिळवून देण्यासाठीचे  व्यासपीठ आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. विविध शासकीय विभागांनी उभारलेल्या स्टॉलची पाहणी करुन जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती जाणून घेतली. 
याप्रसंगी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष रविंद्र नगरे यांनी ग्राहक संरक्षण कायद्याविषयी यथोचित माहिती उपस्थितांना दिली.  अलिबाग येथील राज्य परिवहन आगारातील (एस.टी.स्टँण्ड) येथील मोकळ्या जागेमध्ये ग्राहक उपयोगी बाबींचे स्टॉल लावून विविध योजना व वस्तू बाबतची माहिती ग्राहकापर्यंत पोहचविण्याचे दृष्टीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष रविंद्र नगरे यांच्याहस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. 
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रिझम सामाजिक संस्थेमार्फत पथनाट्याचे सादरीकरण करुन ग्राहक संरक्षण कायद्याविषयी जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमास विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सदस्य तसेच ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज