महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ द्यावा ----जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी



अलिबाग, जि. रायगड, दि.04 (जिमाका)- नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे मागील काही वर्षात शेती निगडीत कर्जाची मुदतीत परतफेड होऊ शकलेली नाही. त्यामुळे शेतकरी थकबाकीदार झालेला आहे व त्यांना शेती कामांना नवीन पीक कर्ज घेण्यासाठी अडचणी निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने  शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहिर केली असून या योजनेचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना संदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी म्हणाले की, या योजने अंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडील दिनांक 01/04/2015 ते 31/03/2019 पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची पुनर्गठन/फेरपुनर्गठन करुन मध्यम मुदत कर्जात रुपांतर केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात दिनांक 30/09/2019 रोजी मुद्दल व व्याजासहीत थकीत असलेल्या व परतफेड न झालेल्या हप्त्याची रक्कम रु.2 लाखापर्यंत असल्यास त्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल.  आधार लिंक हा या योजनेचा मूळगाभा असल्यामुळे शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ मिळण्यासाठी आपल्या कर्जखात्याशी आधारकार्ड लिंक करणे अत्यंत महत्वाचे आहे. या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका,व्यापारी बँका,ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना दिलेले तसेच राष्ट्रीयकृत बँका व व्यापारी बँकानी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना‍ दिलेले अल्पमुदत पीक कर्ज व अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठित/फेर पुनर्गठित कर्ज विचारात घेण्यात येईल.  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 च्या अधिक माहितीसाठी जिल्ह्यातील  शेतकऱ्यांनी शासन निर्णयाच्या अटी व शर्तीनुसार सदर योजनेचा लाभ मिळविण्यासाठी  संबंधित तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याशी संपर्क साधावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.   यावेळी संगणकीय सादरीकरणाद्वारेही योजनेची माहिती उपस्थितांना दाखविण्यात आली. 
याबैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे तसेच तहसिलदार सर्व,गटविकास अधिकारी,तालुका कृषि अधिकारी, विविध बँकाचे अधिकारी,कर्मचारी आणि विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत