शहीद वीर यशवंतराव घाडगे यांच्या स्मारकासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला जाईल -पालकमंत्री आदिती तटकरे
अलिबाग, जि. रायगड, दि.09 (जिमाका)- दुसऱ्या महायुध्दात अभुतपूर्व शौर्य दाखवून
आपल्या देशाची धाडसी परंपरा दाखवून देशसेवेसाठी प्राणाची आहुती देणाऱ्या माणगाव
तालुक्यातील पळस गावचे शहीद वीर यशवंतराव
घाडगे यांच्या स्मारकासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही राज्याच्या
उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण,
राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा श्रीमती आदिती तटकरे यांनी आज येथे दिली. माणगाव
येथील जुने तहसिलदार कार्यालय येथे आयोजित शहीद वीर यशवंतराव घाडगे
व्हिक्टोरिया क्रॉस मानचिन्हधारक (मरणोत्तर) यांच्या जयंती समांरभ कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी आमदार अनिकेत तटकरे,
नगराध्यक्षा श्रीमती योगिता चव्हाण, ब्रिगेडियर सुधीर सावंत, कर्नल सी.जे.रानडे, बेळगाव
येथील सुभेदार अनिल भोसले, उपविभागीय अधिकारी माणगाव श्रीमती प्रशाली दिघावकर,
तहसिलदार श्रीमती प्रियांका अहिरे आदि उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्रीमती तटकरे म्हणाल्या की, रायगड
जिल्ह्यातील अनेक सुपूत्रांनी देशासाठी प्राणार्पण केले असून देशसेवेसाठी जिल्हा
नेहमी अग्रगण्य राहिला आहे. त्यामुळे
सैनिकांनी केलेल्या शौर्याचे स्मरण राहावे त्यांची आठवण चिरकाल टिकावी. यासाठी
दरवर्षी शहीद वीर यशवंतराव घाडगे यांचा
जयंती उत्सव साजरा करण्यात येतो. सैनिकांच्या
कार्याची माहिती असणारी पुस्तके शाळेतील विद्यार्थ्यांना देण्याचा उपक्रम राबविला
जावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
भारतीय सैन्याची गौरवशाली परंपरा अखंड रहावी यासाठी मुलींनी सैन्यात आले
पाहिजे व अधिकारी झाले पाहिजे. त्यासाठी
सर्व क्षेत्रात महिलांचा सहभाग महत्वाचा आहे. माणगाव येथे माजी सैनिकांसाठी हक्काची वास्तू
व्हावी यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
देशसेवेसाठी
तरुण निर्माण व्हावेत म्हणून संकटांना सामोरे कसे जावे यासाठीचे प्रशिक्षणही
तितकेच महत्वाचे आहे. माजी सैनिकांनी त्यांच्या
समस्या संदर्भात जी निवेदने दिली आहेत त्याची पूर्तता करण्यात येईल. या उत्सवानिमित्त विविध शाळा, महाविद्यालयात इयत्ता 5 ते 7 वी, इयत्ता
8 वी 10 वी अशा दोन गटात चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले
होते. या स्पर्धांमध्ये प्राविण्य
मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पालकमंत्री श्रीमती तटकरे यांच्याहस्ते प्रशस्तीपत्रक
देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या
प्रारंभी शहीद वीर यशवंतराव घाडगे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मानवंदना
देण्यात आली. तसेच वीरपत्नी लक्ष्मीबाई घाडगे यांचा सन्मानही करण्यात आला.
कार्यक्रमानंतर
माणगाव येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली की,
शासनाच्या विविध योजना जिल्ह्यातील तळागाळातील घटकांपर्यंत पोहचविण्यात
येतील. जिल्ह्यातील विकासकामे, प्रलंबित
प्रकल्पासंदर्भात लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांची जिल्हास्तरीय बैठक घेण्यात
येणार आहे. जिल्हा पर्यटनदृष्टया
महत्वाचा असल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांना मुलभूत सेवा-सुविधा देण्यात येतील. माणगाव तालुक्यात असलेल्या विविध समस्या
सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तालुका क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीकामाला
प्राधान्य देऊन पुढील नवीन कामांसाठीही निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.
कार्यक्रमाचे
प्रास्ताविक तहसिलदार प्रियांका अहिरे यांनी केले. या कार्यक्रमाला विविध शासकीय विभागाचे
अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थींनी तसेच नागरिक मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
00000
Comments
Post a Comment