पनवेल उपजिल्हा रुग्णालय महानगरपालिकेकडून जिल्हा कोविड रुग्णालयाकरिता अधिग्रहीत
वृत्त क्रमांक 127 दि.02 एप्रिल
2020
अलिबाग,जि.रायगड.दि.02
(जिमाका) – करोना
विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा भाग म्हणून
आज जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या आदेशान्वये पनवेल उपजिल्हा रुग्णालय,
जिल्हा कोविड रुग्णालयकरिता पनवेल महानगरपालिकेकडून अधिग्रहीत करण्यात आले
आहे. त्यासंबंधीची बैठक आज पनवेल
महानगरपालिका येथे आयुक्त श्री.गणेश
देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी पनवेल महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त डॉ.रसाळ, प्रांताधिकारी दत्तू
नवले, तहसिलदार अमित सानप, पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.
नागनाथ यमपल्ले,पनवेल महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ.इटकरे,तालुका आरोग्य अधिकारी
डॉ.सुनिल नखाते यांची उपस्थिती होती.
या बैठकीत महापालिका
आयुक्त श्री.देशमुख यांनी या
रुग्णालयासाठी आवश्यक असणारी साधन सामुग्री,मनुष्यबळ, इतर अनुषंगिक बाबींविषयीचा
आढावा घेतला व त्याबाबींच्या पूर्ततेसाठी संबंधितांनी जिल्हा शल्य चिकित्सक
कार्यालयाकडे त्वरित प्रस्ताव पाठवून त्याची पूर्तता करुन घ्यावी, अशा सूचना
दिल्या.
हे 100 खाटांचे रुग्णालय आता जिल्हा कोविड रुग्णालय म्हणून ओळखले जाणार
आहे. पूर्णतः विलगीकरण कक्ष असलेले हे रुग्णालय सर्वतोपरी सुसज्ज ठेवण्यासाठी आले
आहे.
पनवेल उपजिल्हा रुग्णालय येथे नव्याने स्थापित करण्यात आलेल्या या करोना
कोविड-19 रुग्णालयाची जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी नुकतीच पाहणी केली
होती.
या रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) येणाऱ्या रुग्णांना तपासणीसाठी व प्राथमिक उपचारांसाठी जवळच्या
महानगरपालिकेच्या शहरी आरोग्य केंद्रांमध्ये तर प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या
महिलांना कळंबोली येथील एमजीएम इस्पितळात पाठविले जाणार आहे. याकरिता एमजीएम रुग्णालयाचे मुख्य ट्रस्टी सुधीर कदम आणि या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक
डॉ.सलगोत्रा यांच्याशीही चर्चा होऊन सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
000000
Comments
Post a Comment