शेजारधर्माची जाणीव ठेवत पशूसंवर्धन विभागाने परजिल्ह्यातील मजूरांच्या चेहऱ्यावर फुलविले हसू मजूरांसहित त्यांच्या पशूधनाच्या खाद्याचाही सोडविला प्रश्न




अलिबाग, जि. रायगड, दि.17 (जिमाका) : रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी हिरकणीवाडी व पाचाड येथे किल्ल्याच्या कामासाठी परजिल्ह्यातून आलेले कामगार अडकून राहिलेले आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे पशूधनही (90 गाढवे) अडकून पडलेली होती. याची दखल जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी तात्काळ घेवून पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. म्हस्के यांना हे कामगार व त्यांच्या पशूधनासाठी तातडीने मदत उपलब्ध करून देण्याविषयी आदेश दिले.
पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुभाष म्हस्के व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.अर्ले हे तात्काळ कामाला लागले, त्यांनी क्षेत्रीय पातळीवरील अधिकाऱ्यांना प्रोत्साहित केले व  स्थानिक स्तरावरून मदतीचे नियोजन करुन या मजूरांसाठी अन्नधान्य व त्यांच्या पशूधनासाठी अवघ्या  3 तासात चारा उपलब्ध करून देण्यास यश मिळविले.
यात विशेष उल्लेख म्हणजे छत्री निजामपूरचे सरपंच प्रेरणा प्रभाकर सावंत, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.दत्तात्रय सोनावळे आणि ग्रामसेवक विजय जाधव, पशूधन पर्यवेक्षक मंजुषा गायकवाड, शिवराम दर्शने यांनी अधिक प्रयत्न करुन या मजूरांचा अन्नधान्याचा व त्यांच्या पशूधनाच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविला. हे सर्व करताना या सर्वांनी मास्क वापरणे, सॅनिटायजर वापरणे, सोशल डिस्टंन्सिंग पाळणे  या सर्व नियमांचे पालन करीत परजिल्ह्यातून आलेल्या गरजू मजूरांच्या चेहऱ्यावर हसू फुलविले.
 पशूसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मजूरांचा व त्यांच्या पशूधनाचा केवळ जेवणाचाच प्रश्न मिटविला असे नाही, तर जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या मजूरांच्या भविष्याचा विचार करून त्यांना स्थानिक स्तरावर रस्ते बांधकामाची जी कामे चालू आहेत, त्या कामांवर मजूरीची कामेही  उपलब्ध करुन दिली आहेत. त्यामुळे त्यांच्या भविष्याचीही चिंता मिटली आहे.

अशाच प्रकारे अलिबाग समुद्र किनारी घोडागाडी व्यवसाय करणाऱ्या अन् सध्‌या लॉकडाऊनमुळे पर्यटन व्यवसाय बंद असल्याने उपासमार होणाऱ्या अंदाजे 100 घोड्यांसाठी 300 किलो  मका, भरडा प्रीमियम पोल्ट्री,  अलिबाग यांच्या सहकार्याने जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अलिबाग येथे  पुरविण्यात आला.  यासाठी पशुधन विकास अधिकारी डॉ. मेघा खवस्कर, पशुधन पर्यवेक्षक श्री. कैलास चौलकर, श्री. सुहास जोशी, जिल्हा पशुसंवर्धन, उपआयुक्त कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी  पुढाकार घेतला
या परजिल्ह्यातील मजूरांच्या,  घोडागाडीचा व्यवसाय करणाऱ्या या स्थानिकांच्या चेहऱ्यावरील फुललेले हसू पाहून त्यांना मदत करणाऱ्यांच्या चेहऱ्यावरही  समाधान उमटले.
00000


Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत