‘रमजान’ मध्ये मुस्लिम बांधवांनी घरातच रोजा इफ्तार, तरावीह पठण करावे करोना प्रादूर्भाव टाळण्यासाठी दक्षता घेण्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आवाहन



                                   
            अलिबाग, जि. रायगड, दि.18 (जिमाका) : पुढील आठवड्यात सुरु होणाऱ्या रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधवांनी मशीद किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी न जमता घरातच नियमित नमाज, तरावीह पठण व इफ्तार इत्यादी धार्मिक कार्यक्रम करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी केले आहे.  
करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात 3 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात सार्वजनिक ठिकाणी सर्व धर्मांचे धार्मिक कार्यक्रम, प्रार्थना आदींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुषंगाने लॉकडाऊनच्या कालावधीत नियमित नमाज पठण, तरावीह व इफ्तारीसाठी एकत्र न येण्याबाबत केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाने सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बांधवांना जिल्हा प्रशासनाकडून हे आवाहन करण्यात आले आहे.
करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात सामाजिक विलगीकरणाच्या सूचनांचे पालन पवित्र रमजान महिन्यामध्ये देखील कटाक्षाने करावयाचे आहे. कोणत्याही परिस्थितीत मशिदीमध्ये नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी एकत्र येऊ नये.  घराच्या, इमारतीच्या छतावर एकत्र येऊन नियमित नमाज पठण अथवा इफ्तार करण्यात येऊ नये. मोकळ्या मैदानावर एकत्र जमून नियमित नमाज पठण तसेच इफ्तार करण्यात येऊ नये. कोणताही सामाजिक, धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम एकत्रित येऊन करु नये, लॉकडाऊनविषयी पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी केले आहे.
०००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक