नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन सदैव तत्पर -पालकमंत्री कु.आदिती तटकरे




अलिबाग,दि.29 (जिमाका) – करोनाच्या संकटावर मात करण्यासाठी शासन आणि प्रशासन मिळून सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. या परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन सदैव तत्पर असून नागरिकांनी घाबरु नये, असे प्रतिपादन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले.
जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना संबंधित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी खासदार सुनिल तटकरे, सर्वश्री आमदार रविशेठ पाटील, भरतशेठ गोगावले, महेंद्र दळवी, अनिकेत तटकरे, बाळाराम पाटील, प्रशांत ठाकूर, महेश बाळदी, जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद गवई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे,निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या की, अलिबाग येथे स्वॅब टेस्टिंग लॅब सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, लवकरच ही लॅब अलिबागमध्ये सुरु होईल.  करोनाची लक्षणे दिसून येणाऱ्या व दारिद्रयरेषेखाली असणाऱ्या  लोकांची स्वॅब टेस्ट करण्यासाठी होणारा खर्च जिल्हा नियोजन निधीमधून करण्यात येईल.
आरोग्य यंत्रणेमधील वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सर्व प्रकारची काळजी घेत असून प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर किंवा इतर कर्मचाऱ्यांच्या सेवा  कोविड-19 च्या कामकाजासाठी जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात दिल्या जाणार नाहीत असे सांगून पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी प्रशासनाला सूचना दिल्या की, कोविड-19 रुग्णालये (DCH), कोविड आरोग्य केंद्र (DCHC) आणि कोविड उपचार केंद्र (CCC) या ठिकाणच्या आरोग्य सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये याची काळजी घ्यावी. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी असलेल्या एमबीबीएस डॉक्टरांची यादी सादर करावी.  तसेच जिल्हयातील ॲम्ब्युलन्स वाहनचालकांचे प्रबोधन करुन त्यांना धैर्य देऊन ते कोविड रुग्णाला  नेण्यासाठी नकार देणार नाहीत यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी मिळून प्रयत्न करावेत. करोनाबाधित रुग्णांना ने-आण करण्यासाठी ॲम्ब्युलन्सच्या वाहनचालकांना सुरक्षेविषयी लागणाऱ्या आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात.  अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत असणाऱ्या मात्र कंटेनमेंट झोनमध्ये राहत असल्यामुळे कामावर न जाऊ शकणाऱ्या कामगारांबाबत, कर्मचाऱ्यांबाबत त्यांच्या आस्थापनांना अशा कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्यात येऊ नये असे पत्र प्रशासनाकडून देण्यात यावे.  येणाऱ्या पुढील काळासाठी सर्वजण एकजुटीने खंबीरपणे उभे राहू या,असेही त्यांनी उपस्थितांना शेवटी आवाहन केले.  
पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी मेट्रोपोलिस लॅब यांच्याशी समन्वय साधल्यानंतर त्या लॅबने जिल्ह्यातील  10 हजार लोकांचे स्वॅब टेस्टिंग मोफत करुन देण्यात येईल, असे निश्चित झाल्याने त्याबद्दल आयुक्त सुधाकर देशमुख आणि मेट्रोपोलिस लॅबचे या बैठकीत उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींकडून विशेष अभिनंदनाचा ठराव  घेण्यात आला.
यावेळी खासदार सुनिल तटकरे यांच्यासह उपस्थिती लोकप्रतिनिधींनी कोविड उपचार केंद्रामधील आरोग्य कर्मचाऱ्यांची व्यवस्थित काळजी घेतली जावी, त्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा दिल्या जाव्यात, सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपआपल्या कार्यालयामध्ये उपस्थित राहून लोकोपयोगी कामांना तातडीने सुरुवात करावी, मूळचे रायगड जिल्ह्याचे असणाऱ्या परंतु लॉकडाऊमुळे परराज्यात अडकलेल्या नागरिकांना  जिल्ह्यात परत आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तातडीचे प्रयत्न केले जावेत, आरोग्य यंत्रणेतील रिक्त पदे लवकरात लवकर भरली जावीत यासाठी प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, आवश्यकता भासल्यास खाजगी रुग्णालये अधिग्रहित करावीत, पुढील परिस्थितीचा विचार करुन आवश्यक उपाययोजना आताच करुन ठेवाव्यात, अशा सूचना प्रशासनाला दिल्या. तसेच संपूर्ण लॉकडाऊन कालावधीत रायगडकरांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला दिलेल्या  सहकार्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले.
बैठकीच्या सुरुवातीला जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात मृत्यू पावलेल्या नागरिकांना दोन मिनिटे मौन पाळून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.  त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद गवई व जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडून करानो बाधित रुग्णांकरिता करण्यात येणाऱ्या उपाययोजना संदर्भात, उपलब्ध साधन सामुग्रीबाबत, आरोग्य विषयक काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविषयी माहिती दिली.
या बैठकीस सर्व तहसिलदार, आरोग्य यंत्रणेचे अधिकारी, इतर विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
000000


Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत