जिल्हयात 12 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन
अलिबाग,जि.रायगड,दि.04
(जिमाका) : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्याकडील पत्रानुसार रायगड
जिल्ह्यामध्ये दि. 12 डिसेंबर, 2020 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले
आहे.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित
असलेली भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, 138 एन आय.अॅक्ट खालील
प्रकरणे, दिवाणी अपिले, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे व अपिले ठेवली जाणार आहेत. तसेच,नगरपालिका
व ग्रामपंचायत यांच्या घरपट्टी व पाणीपट्टी बिलाच्या देयकांबाबतची वादपूर्व प्रकरणे,
भारत दूर संचार निगम लिमिटेड, वीजवितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था यांचेकडिल
थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणेही या लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.
दि. 08 फेब्रुवारी 2020 रोजी संप्पन्न झालेल्या
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये अलिबाग तालुक्यातील कल्याण व उसर या गावातील 162 भूसंपादनाची
दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी 49 प्रकरणामधील पक्षकारांनी
तडजोड केली व तडजोडीची/नुकसानभरपाईची रक्कम त्यांना तात्काळ प्राप्त झाली आहे. त्यामुळे
त्वरीत न्याय मिळण्याच्या दृष्टीने लोकअदालतीमध्ये न्यायालयीन प्रलंबित व दाखलपूर्व
प्रकरणे तडजोडीने निकाली होणे फायद्याचे ठरत आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे
सचिव तथा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश श्री.संदिप स्वामी यांनी दिली आहे.राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये
प्रकरणे तडजोडीने निकाली केल्यास लोकांचा पैसा आणि वेळ यांचा अपव्यय होत नाही, पक्षकारांना
तात्काळ न्याय मिळतो.
त्यामुळे दि.12 डिसेंबर 2020 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय
लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि
या लोकअदालतीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र
न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग श्रीमती. विभा प्र.
इंगळे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment