पेण येथील आदिवासी कुटुंबातील अत्याचारग्रस्त बालिकेच्या कुटुंबाला सामाजिक न्याय विभागाकडून रु.4 लाख 12 हजार 500 ची आर्थिक मदत
अलिबाग,जि.रायगड दि.06 (जिमाका) :- पेण
येथे दि. 30 डिसेंबर 2020 रोजी आदिवासी समाजातील तीन वर्षीय बालिकेला घरातून उचलून
नेऊन तिच्यावर पाशवी अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, रायगड तथा अध्यक्ष
जिल्हा दक्षता संनियंत्रण समिती, रायगड आणि सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड यांनी
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम 1989 सुधारित अधिनियम,2015
व सुधारित नियम,2016 अंतर्गत तातडीच्या मदतीस मंजूरी दिली. यानुषंगाने अत्याचारग्रस्त
बालिकेच्या कुटुंबातील वारस म्हणून वडील जयराम पांडुरंग वाघमारे आणि आई सौ.निकिता वाघमारे
यांना रु.4 लाख 12 हजार 500 रुपयांचा धनादेश आणि एक महिना पुरेल इतक्या अन्नधान्याचे
किट काल सायंकाळी (दि. 5 जानेवारी ) सुपूर्द करण्यात आले.
पालकमंत्री कु.आदिती तटकरे व जिल्हाधिकारी निधी चौधरी
यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण रायगड सुनिल जाधव यांनी ही
कार्यवाही तातडीने पूर्ण केली.
अत्याचारग्रस्त बालिकेच्या कुटुंबाला मदतीचा धनादेश
देताना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण रायगड सुनिल जाधव यांच्यासह पेण उपविभागीय अधिकारी
विठ्ठल इनामदार, पेण उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती चव्हाण, पेण तहसिलदार श्रीम.अरुणा
जाधव, पोलीस
निरीक्षक बाळकृष्ण जाधव, समाज कल्याण निरीक्षक अंकुश पोळ उपस्थित होते.
0000000
Comments
Post a Comment