मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांचे कोविड योगदान महाराष्ट्र कधीच विसरणार नाही !---पालकमंत्री कु.आदिती तटकरे

 


 

            अलिबाग,जि.रायगड दि.06 (जिमाका) :- या शासनाने विविध खात्यांना आर्थिक बळ देत महत्वाचे प्रकल्प हाती घेण्याचा निर्धार केला होता. त्याच काळात अधिवेशन सुरू होते. नव्या सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणारे काही निर्णय घोषित करून काम हाती घेतले असतानाच करोनाचे संकट उभे राहिले. या परिस्थितीत जागतिक स्तरावर अचानक उद्भवलेल्या कोविडचा सामना करीत राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अत्यंत कुशलतेने प्रशासनाच्या सहकार्याने परिस्थिती हाताळून आटोक्यात आणली. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे कोविड योगदान अवघा महाराष्ट्र कधीही विसरणार  नाही, असे प्रतिपादन राज्याच्या उद्योग, खनिजकर्म, पर्यटन, राजशिष्टाचार राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी काल (दि.5 जानेवारी ) येथे केले.

 पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते 200 कोविड योद्ध्यांचा कोविड संजीवनी पुरस्कार प्रदान सोहळा व या निमित्ताने महिलांसाठी विशेष हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन पनवेल संघर्ष समिती यांच्या पुढाकारातून पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी आमदार बाळाराम पाटील, महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख,ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. भक्तीकुमार दवे, प्रशांत पाटील, सुदाम पाटील, डॉ.नागनाथ यमपल्ले, डॉ.स्वाती नाईक, महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, तहसिलदार विजय तळेकर, डॉ. बसवराज लोहारे, संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल कडू, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र साळस्कर, फारूखशेठ, भरत जाधव, श्री.नेटके आदी मान्यवर उपस्थित होते.

 त्या पुढे म्हणाल्या की, पनवेलमध्ये करोना काळात पनवेल आरोग्य विभाग, महापालिका प्रशासनासोबत पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी अतुलनीय कार्य केले आहे. रुग्णांच्या मदतीच्या अनुषंगाने रात्री-अपरात्री त्यांचा फोन येत असे, कोणत्याही कोविड रूग्णाला काही सहकार्य हवे असल्यास ते सतत माझ्या संपर्कात असायचे,त्यावर तात्काळ पनवेल महानगरपालिका प्रशासनाशी समन्वय साधून पनवेलसाठी उपाययोजना, आरोग्यसुविधा पुरविण्याचे कार्य मार्गी लावले जात होते.

राज्यात नव्यानेच मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बहुतेक विभांगासाठी पुरेसा निधी मंजूर केला होता. त्यामुळे काम करण्याची नवी उर्जा मिळाली. परंतु, त्याच काळात नेमके करोनाचे संकट उभे राहिले. त्यावर मात करीत राज्य सरकारने महाराष्ट्राची विस्कटणारी घडी व्यवस्थित बसविण्यासाठी भगीरथ प्रयत्न केले, ते राज्याने आणि संपूर्ण देशाने पाहिले. कोविडबाबतीत या शासनाने केलेल्या उपाययोजनांचे, मार्गदर्शक तत्वांचे  देशातील इतर काही राज्यांनी अनुकरणही केले, हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीचे यशच मानावे  लागेल,असेही  पालकमंत्री कु.तटकरे म्हणाल्या.

याप्रसंगी कोविड संजीवनी पुरस्कारप्राप्त योद्ध्यांच्या यथोचित गौरवार्थ आमदार बाळाराम पाटील, महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख,ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. भक्तीकुमार दवे, डॉ.नागनाथ येमपल्ले, डॉ.स्वाती नाईक, प्रशांत पाटील, सुदाम पाटील, संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
            उपस्थित मान्यवरांचे भास्करराव चव्हाण, मल्लीनाथ गायकवाड, भास्कर भोईर, आशा चिमणकर, शैला म्हात्रे, राजेश्‍वरी बांदेकर, शुभांगी लखपती, संतोष शुक्ला, मम्मी नायक, प्रमिला पाटील, सीमा नायक, रमेश गोवारी, योगेश पगडे, सुनील भोईर, सचिन पाटील, हर्षल पाटील, किरण करावकर, महेंद्र पाटील, मंगल भारवाड, विजय कलोते, भूषण साळुखे, दर्शन ठोंबरे, स्वप्निल म्हात्रे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन तुळशीदास राठोड यांनी तर आभार अभिजित पुळेकर यांनी मानले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक