जिल्ह्यातील अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील वर्ग सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आदेश जारी
अलिबाग,जि.रायगड,दि.15(जिमाका):- सार्वजनिक आरोग्य विभागाकडील
अधिसूचनेद्वारे साथरोग अधिनियम 1897 मधील खंड 2, 3 व 4 ची अंमलबजावणी राज्यात अधिसूचनेच्या
प्रसिध्दी दिनांकापासून सुरु करण्यात आलेली आहे.
जागतिक
आरोग्य संघटनेने करोना विषाणू संक्रमण हा जागतिक साथीचा रोग (World Pandemic) घोषित
केला असून सार्वजनिक आरोग्य विभागाकडील अधिसूचनेद्वारे करोना विषाणूचा प्रसार रोखण्याकरिता
महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 प्रसिध्द केले आहेत.
त्यानुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील परिपत्रकान्वये
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे,
स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग
दि.15 फेब्रुवारी 2021 पासून सुरु करण्यास मान्यता दिलेली आहे. तसेच यापूर्वीच जिल्ह्यात
इ.9 वी ते 12 वी आणि इ. 5 वी ते इयत्ता 8 वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यास मान्यता देण्यात
आली आहे.
आपत्ती
व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 व 30 तसेच महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम
2020 मधील नियम 10 अन्वये प्राप्त अधिकारानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दि.5 नोव्हेंबर
2020 रोजीच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीन राहून जिल्ह्यात
दि.15 फेब्रुवारी 2021 पासून अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित
विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील वर्ग सुरु करण्यास जिल्हाधिकारी
रायगड तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी
मान्यता आदेश जारी केले आहेत. तसेच इतर वर्ग पूर्वीप्रमाणेच ऑनलाईन सुरु असतील. हे
वर्ग सुरु होण्यापूर्वी सर्व संबधित अध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कोविड-
19 ची चाचणी करुन घेणे आवश्यक आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान
संहिता कलम 188, 269, 270, 271 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 सह अन्य
तरतूदीनुसार फौजदारी शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
०००००
Comments
Post a Comment