पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींनी आणखी जोमाने काम करुन राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत -- पालकमंत्री आदिती तटकरे “आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव” पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते झाले वितरण शिवकर व खामगाव ग्रामपंचायतींना “जिल्हास्तरीय सुंदर गाव” पुरस्कार
वृत्त क्रमांक 151
दिनांक 16 फेब्रुवारी 2021
अलिबाग,जि.रायगड,दि.16
(जिमाका) :-
रायगड जिल्हा परिषदेतर्फे आर.आर.( आबा) पाटील तालुका व जिल्हा सुंदर गाव पुरस्कार वितरणाचा
दिमाखदार सोहळा आज (दि.16 फेब्रु.रोजी) जिल्हा परिषदेच्या स्व. प्रभाकर पाटील
सभागृहात संपन्न झाला. यावेळी सन-2018-19 व 2019-20 या वर्षातील जिल्हास्तरावरील
पुरस्कारप्राप्त पनवेल तालुक्यातील शिवकर व म्हसळा तालुक्यातील खामगाव या
ग्रामपंचायतींसह तालुकास्तरावरील पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचा पालकमंत्री कु.आदिती
तटकरे यांच्या हस्ते तर आमदार बाळाराम पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी,
उपाध्यक्ष सुधाकर घारे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, कृषी व
पशुसंवर्धन समिती सभापती बबन मनवे, महिला व बालकल्याण समिती सभापती गीता जाधव,
समाजकल्याण समिती सभापती दिलीप भोईर, विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे,
ॲड.आस्वाद पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उप मुख्य कार्यकारी
अधिकारी (ग्रामपंचायत) शितल पुंड यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींनी आणखी
जोमाने काम करुन राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळविण्यासाठी प्रयत्न
करावेत, असे आवाहनही पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले.
त्या पुढे म्हणाल्या, ग्रामविकास
विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट ग्राम योजनेला आर. आर. (आबा) पाटील
सुंदर गाव पुरस्कार योजना असे नाव देण्यात आले आहे. आर.आर. पाटील ग्रामविकासमंत्री
असताना त्यांच्या संकल्पनेतून ग्रामविकासासाठी विविध योजना राबविण्यात आल्या.
यामुळे त्यांच्या नावे योजना राबविणे हा स्तुत्य उपक्रम आहे. तसेच पुरस्कार मिळाला
म्हणून ग्रामपंचायतींनी तेथेच न थांबता आणखी जोमाने काम करावे. प्रत्येक नागरिकाने
सुंदर गाव योजनेत आपले योगदान द्यावे.
आमदार बाळाराम पाटील म्हणाले
की, आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार मिळविण्यासाठी जिल्ह्यातील
ग्रामपंचायतींमध्ये निकोप स्पर्धा पहायला मिळाली. शिवकर व खामगाव ग्रामपंचायतींनी
उत्तम कार्य केले आहे. जिल्हा पातळीवर पुरस्कार मिळवून त्यांनी समाधानी न राहता
राज्य व राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत.
जिल्हा परिषद अध्यक्ष
योगिता पारधी यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, पुरस्कारप्राप्त
ग्रामपंचायतींनी ग्रामपंचायत निधी तसेच त्यांना मिळणारा इतर शासकीय योजनांच्या
निधीचा पुरेपूर वापर करून ग्रामपंचायत हद्दीत विकास केला आहे. या पद्धतीने
जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी काम करावे. तसेच पुरस्कारप्राप्त
ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवकांनी परिसरातील इतर ग्रामपंचायतींना याबाबत
मार्गदर्शन करावे.
सन 2018-19 मधील तालुकास्तरीय पुरस्कारप्राप्त
ग्रामपंचायती:- पनवेल-शिवकर, रोहा- धोंडखार, उरण-चिरनेर, महाड-
पारमाची, पेण- करंबेली, पोलादपूर-काटेतली, अलिबाग- नवगाव, मुरुड-कोर्लई, म्हसळा-
साळविंडे, कर्जत-शिरसे, सुधागड- सिद्धेश्वर, खालापूर- नंदनपाडा, तळा-रोवळा,
माणगाव-विहुले,श्रीवर्धन-दांडगुरी
सन 2019-20 मधील
तालुकास्तरीय पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायती:- म्हसळा- खामगाव, पेण-
आंतोरे, रोहा-मेढा, खालापूर- देवन्हावे, अलिबाग- मान तर्फे झिराड, तळा-निगुडशेत,
सुधागड- रासळ, पनवेल- आकुर्ली, कर्जत-खांडपे, उरण- पाणजे, पोलादपूर-सडवली,
श्रीवर्धन-हरेश्र्वर, मुरुड- आगरदांडा, महाड-तळोशी, माणगाव-कडापे
या सोहळ्याप्रसंगी
पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, रायगड-अलिबाग
मार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजना ग्रामीण अंतर्गत
सन 2016-17 ते 2020-21 या कालावधीत जिल्ह्यासाठी 7 हजार 673 इतके उद्दिष्ट मंजूर
करण्यात आले आहे. त्यापैकी 5 हजार 989 घरकुले पूर्ण केली असून 1 हजार 684 घरकुले
अपूर्ण आहेत. त्यानुसार 78.05 टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती
उपस्थितांना दिली व उपस्थित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत
सदस्य तसेच जिल्ह्यातील सर्व घरकुल लाभार्थ्यांनी अपूर्ण घरकुले दि.28 फेब्रुवारी
2021 पर्यंत पूर्ण करावीत, असे आवाहन केले.
००००००
Comments
Post a Comment