प्रस्तावित आदिवासी बहुउद्देशीय संकुलाकरिता पालकमंत्री आदिती तटकरेंनी केली जांभूळपाडा येथील जागेची पाहणी

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि. 08 (जिमाका) :- मौजे जांभूळपाडा येथे जिल्ह्यातील आदिम जमाती (कातकरी) करिता प्रस्तावित आदिवासी बहुउद्देशीय संकुल उभारणीकरिता आवश्यक जागेची पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी, रविवार, दि.7 फेब्रुवारी 2021 रोजी प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच या माध्यमातून अतिदूर्गम व अविकसित सीमा भागातील या आदिवासी लोकांना जीवनावश्यक सोयीसुविधा कशा प्रकारे उपलब्ध करता येईल, यासंबंधी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी संबंधित पदाधिकारी,अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील 37 हजार 436 आदिवासी कुटुंबांकरिता एक बहुउद्देशीय संकुल उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय शासनाने घेतला असून, त्याकरिता संसाधनांसह इतर अन्य बाबींच्या तपासणीकरिता राज्य शासनाने समिती गठीत केली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त होताच या आदिवासी बहुउद्देशीय संकुलाचे काम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आदिवासी घटकाच्या विकासासाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या प्रयत्नांना गती मिळाली आहे.

आदिवासी जमातीची कुटुंबे ठराविक क्षेत्रामध्ये आढळून येत असल्यामुळे व ही क्षेत्रे अतिदूर्गम व अविकसित सीमा भागांमध्ये असल्यामुळे या लोकांना जीवनावश्यक सोयीसुविधा मिळणे कठीण असते. विभिन्न आदिवासी भागात विखुरलेल्या आदिवासी कुटुंबातील मुलांकरिता योग्य शिक्षण, त्यांची आरोग्य तपासणी व योग्य उपचार, दैनंदिन आवश्यक खाद्य किंवा वस्तूंचा पुरवठा, मनोरंजन व करमणूक, व त्यांच्या उपजीविकेवर आधारित व्यवस्था इत्यादी बाबी एकाच ठराविक ठिकाणी स्थापित केल्यास या घटकाच्या प्रगतीस चालना मिळेल, याकरिता जवळपास 20 हजार कुटुंबाकरिता एक संकुल स्थापित करणे प्रस्तावित आहे. मात्र रायगड जिल्ह्यात हे संकुल जिल्ह्यातील सर्व म्हणजे 37 हजार 436 आदिवासी कुटुंबांकरिता प्रस्तावित करण्यात आले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज