पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त अर्ज करावेत -- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्ज्वला बाणखेले
अलिबाग,जि.रायगड, दि.4,(जिमाका)
:- महाराष्ट्र राज्य हे फलोत्पादनामध्ये अग्रेसर असून राज्यात
मोठया प्रमाणात फळे व भाजीपाला पिकांचे व्यावसायिक पध्दतीने लागवड करून उत्पादन घेतले
जाते. तसेच त्याची निर्यातही मोठया प्रमाणात
करण्यात येते. मागील 2 ते 3 वर्षांमध्ये भाजीपाला
पिकांचे निर्यातक्षम व विषमुक्त उत्पादन करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. त्यामुळे भाजीपाला बियाणांच्या चांगल्या जाती व चांगली
रोपे यांची मागणी वाढत आहे. त्यादृष्टीने नियंत्रित वातावरणामध्ये तयार झालेली किड
व रोगमुक्त भाजीपाला रोपांची मागणी मोठया प्रमाणावर वाढत आहे.
जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात दर्जेदार किड व रोगमुक्त रोपे तयार करणाऱ्या
लहान रोपवाटिका उभारण्यास वाव आहे. या उद्देशाने शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना नव्याने सुरु केली आहे. रोपवाटिकेमुळे
स्थानिक शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाची संधी उपलब्ध करुन देणे व पिक रचनेत बदल घडवून
आणणे तसेच नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न व भाजीपाला उत्पादनात
वाढ करण्यासाठी शासनाने प्रत्येक जिल्हयातील तालुक्यास किमान 1 रोपवाटीका उभारण्याचे
प्रस्तावित केले आहे.
यासाठी लाभार्थी निवड करताना लाभार्थीकडे स्वतःच्या मालकीची किमान 0.40
हे. जमीन असणे आवश्यक आहे. (7/12) व रोपवाटिका उभारण्यासाठी पाण्याची कायमची सोय असणे
आवश्यक आहे. योजनेच्या लाभासाठी प्रथम महिला कृषी पदवीधारक, द्वितीय महिला गट, महिला
शेतकरी, इतर भाजीपाला उत्पादक गट, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी, शेतकरी गट यांना तृतीय
प्राधान्य आहे. शासनाच्या लाभ घेतलेल्या व
खाजगी रोपवाटिकाधारकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. या योजनेकरिता 4 लक्ष 60
हजार रुपये खर्चाची मर्यादा असून त्यासाठी 50 टक्के अनुदान रक्कम रू. 2.30 लाख अनुदान
लाभार्थ्यांस देयआहे.
जिल्हयातील 15 तालुक्यांमध्ये भाजीपाला रोपवाटिकेची उभारणी करण्यात
येत असून त्यापैकी सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण 14 व अनुसूचित जातीसाठी एकूण 2 रोपवाटिका
उभारणी करण्यात आलेली आहे. तालुका कृषी कार्यालय, अलिबाग यांच्या कार्यक्षेत्रात एकूण
226 गावे असून 18 कृषी सहाय्यक व 4 कृषी पर्यवेक्षक कार्यरत आहेत. जिल्हा मुख्यालय
असलेल्या अलिबाग येथे भाजीपाला रोपवाटिका उभारणी करण्यासाठी प्राधान्यक्रम आहे. सद्य:स्थितीत
रोपवाटिका उभारणीसाठी एकाही लाभार्थ्याची नोंद झालेली नाही. त्यामुळे तालुका अलिबाग
येथे एकही भाजीपाला रोपवाटिका उभारणी करण्यात आलेली नाही.
अलिबाग
तालुका हा पर्यटनासाठी प्रसिध्द असल्याने या ठिकाणी पर्यटकांकडून भौगोलिक मानांकनासाठी
प्रस्तावित केलेला पांढरा कांदा, भौगोलिक मानांकन असलेला हापूस आंबा व इतर भाजीपाला
याला प्रचंड मागणी आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी पांढरा कांदा, भाजीपाला, आंबा उत्पादन
व त्याखालील क्षेत्र वाढविता येऊ शकते. तसेच हवामान बदलाचा विचार करता भविष्यात तयार
रोपे, कलमे यांची मागणी मोठया प्रमाणात वाढणार आहे. पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेल्या
अलिबाग तालुक्यामध्ये अद्यापपर्यंत एकही भाजीपाला रोपवाटिकेची उभारणी करण्यात आलेली
नाही. येथील शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर रोपवाटिका योजनेचा लाभ घेण्यास भरपूर वाव आहे.
तरी इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, अलिबाग
यांच्याकडे जास्तीत जास्त अर्ज करावेत,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
श्रीमती उज्ज्वला बाणखेले यांनी केले आहे.
००००००
Comments
Post a Comment