उत्तम कुटूंब व्यवस्थेतून होते चांगल्या समाजाची जडण-घडण--प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती विभा इंगळे
अलिबाग,जि.रायगड,दि.9 (जिमाका):- उत्तम कुटुंबातूनच चांगला समाज घडतो. ती जबाबदारी आई-वडिलांची
आहे, म्हणजेच त्याचे मूळ कुटुंब व्यवस्थेमध्ये आहे, त्यातूनच समाजाची चांगल्या
प्रकारे जडण-घडण होऊ शकेल, असे मत येथील जिल्हा न्यायालयाच्या प्रमुख जिल्हा व सत्र
न्यायाधीश श्रीमती विभा इंगळे यांनी काल (दि.8 मार्च) येथे व्यक्त केले.
जिल्हा प्रशासनातर्फे काल (दि.8 मार्च)
जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा नियोजन भवन सभागृहात महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल
जगताप, जिल्हाधिकारी निधी चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे, जिल्हा अधीक्षक
भूमी अभिलेख चारुशीला चव्हाण, उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली
माने, अलिबागच्या प्रांत अधिकारी शारदा पोवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
कुटुंबव्यवस्थेचे महत्व अधोरेखित
करताना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा इंगळे पुढे म्हणाल्या की, आजच्या बदलत्या
परिस्थितीत वैयक्तिक आणि सामाजिक सुरक्षाही चिंतेची बाब आहे. शिक्षण,पैसा यापेक्षाही
मानवी मूल्ये महत्वाची आहेत. ही मूल्ये प्रत्येक कुटुंबातून मुलींसह मुलांनाही शिकविणे,
ही काळाची गरज आहे. आजची पिढी चांगली घडली तरच भविष्यातील समाज चांगला असणार आहे. त्यामुळे
आपल्या मुलांवर आपण काय संस्कार करतो? ही नैतिक जबाबदारी आई-वडिलांवर आहे, यातूनच कौटुंबिक
आणि सामाजिक सुरक्षितता निर्माण होणार आहे.
पुरुषांनी स्त्रियांकडे बघण्याची
दृष्टी बदलणे आवश्यक असून त्यांनी स्त्रियांप्रती समभावना स्वीकारायला हवी, तसेच सुरक्षिततेच्या
दृष्टीकोनातून प्रत्येक लहान मुलां-मुलींना स्वयंसुरक्षेची तंत्रे शिकवली पाहिजेत.
त्याकरिता पालकांनी सतत सजग असणे आवश्यक असल्याचेही प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश
विभा इंगळे म्हणाल्या.
या कार्यक्रमाच्या
निमित्ताने जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी
जिल्हा प्रशासनाचा गाडा हाकणाऱ्या महिला अधिकाऱ्यांचे उत्स्फूर्तपणे कौतुक केले. बदललेल्या
सामाजिक परिस्थितीवर परखड भाष्य करताना त्यांनीआपल्या भाषणातून महिलांवर अत्याचाराच्या
वाढत्या घटनांकडेही लक्ष वेधले. कुटुंबातून आजच्या पिढीला योग्य संस्कार मिळाले,
घरातील मुलाला आणि मुलीलाही समसमान वागणूक, संस्कार, विश्वास आणि बळ मिळाले तर हे चित्र
नक्कीच बदलेल, असा विश्वास जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी यावेळी व्यक्त केला. त्याचबरोबर
त्यांनी महिला प्रत्येक क्षेत्रात सक्षमपणे काम करीत यशस्वी होत असल्याची अनेक उदाहरणांमधून
दिली.
कोविडविषयी सर्व नियमांचे काटेकोर
पालन करीत अत्यंत शिस्तबध्द पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध क्षेत्रात
आपले कर्तृत्व गाजविणाऱ्या महिलांना सन्मानपत्र, तुळशीचे रोप, पुष्प देऊन गौरविण्यात
आले. या कार्यक्रमाला उपस्थित सर्व महिलांच्या हातावर मेहंदी काढून हा महिला दिन वेगळया
पध्दतीने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या
निमित्ताने महिलांसाठी आरोग्य, कायदे, सामाजिक आव्हाने पार पाडताना महिलांनी घ्यावयाची
स्वतःची काळजी,आहार, व्यक्तिमत्व विकास अशा विविध विषयांवर अलिबाग विधी
महाविद्यालयाच्या ॲड. निलम हजारे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.मेघा घाटे, आदर्श शिक्षण
संस्था पनवेलच्या प्राचार्य डॉ. प्रा.सीमा कांबळे, आहारतज्ञ डॉ.प्राची आंबोलकर,
जिल्हा परीविक्षा अधिकारी शकुंतला वाघमारे, श्रीमती माधवी पवार या तज्ज्ञांची अतिशय
माहितीपूर्ण व प्रोत्साहनपर व्याख्याने संपन्न
झाली.
याप्रसंगी महिला मतदार
नोंदणी अधिकारी म्हणून उत्तम काम केलेल्या कर्जत उपविभागीय अधिकारी श्रीमती वैशाली
परदेशी, उपजिल्हाधिकारी अश्विनी पाटील, अलिबाग उपविभागीय अधिकारी शारदा पोवार,
महाड उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड, महिला सहाय्यक मतदार नोंदणी
अधिकारी म्हणून उत्तम काम केलेल्या पेण तहसिलदार डॉ.अरुणा जाधव, रोहा तहसिलदार
श्रीमती कविता जाधव, माणगाव तहसिलदार श्रीमती प्रियंका कांबळे, पोलादपूर तहसिलदार
श्रीमती दिप्ती देसाई, उत्कृष्ट महिला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून काम केलेल्या आशा वर्कर श्रीमती अक्षता
पाटील, प्रतिक्षा म्हात्रे, अंगणवाडी सेविका ज्योती पाटील, नगरपालिका कर्मचारी
कविता चर्जन, पोलीस पाटील श्रीमती प्राजक्ता पाटील, उत्कृष्ट निवडणूक साक्षरता
क्लब म्हणून कोकण एज्युकेशन जा.र.ह.कन्या
शाळा, अलिबाग, पी.एन.पी.एज्युकेशन सोसायटी आर्टस, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय, वेश्वी अलिबाग,
उत्कृष्ट सामाजिक संस्था म्हणून प्रिझम सामाजिक संस्था, महिला आयकॉन म्हणून तपस्वी
नंदकुमार गोंधळी, महिला पत्रकार म्हणून शारदा धुळप (निवृत्त,दै.सामना), सुवर्णा
दिवेकर(दै.पुढारी), प्रमिला जोशी (दै.महानगर), सारिका पाटील (दै.रायगड नगरी),
श्वेता जाधव (दै.रायगड टाईम्स, अलिबाग) या महिलांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते
प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवातीस
उपस्थित मान्यवर महिला पाहुण्यांचे औक्षण करण्यात आले, त्यानंतर दीपप्रज्वलन
करण्यात आले. यावेळी कोकण एज्युकेशन जा.र.ह.कन्या शाळेच्या संगीत
शिक्षिका सुजाता लोहकरे व तबला वादक अदिकांत पाटील यांनी स्वागतगीताचे सादरीकरण
केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक
उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती वैशाली माने यांनी केले. आभार प्रदर्शन अलिबाग
उपविभागीय अधिकारी शारदा पोवार यांनी केले. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी
डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी सर्व उपस्थित महिलांच्या वतीने प्रातिनिधीक स्वरुपात मनोगत
व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसिलदार श्रीमती राजश्री साळवी,अलिबाग
तालुका नायब तहसिलदार श्रीमती सुरेखा घुगे
यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उत्तम समन्वयाची भूमिका निभावली.
या महिलादिनाच्या
निमित्ताने जिल्हा रुग्णालयाच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांच्या
मार्गदर्शनाखाली महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने
महिला अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, महाविद्यालयीन विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.
००००००
Comments
Post a Comment