कोविड-19 चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभाग झाला सज्ज

 

वृत्त क्रमांक:- 278                                                          दिनांक:- 08 एप्रिल 2021


 

अलिबाग,जि.रायगड दि.8 (जिमाका) :- महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाद्वारे कोविड-19 रोग प्रसार खंडीत करणे (ब्रेक द चेन) अभियानांतर्गत दि. 04 एप्रिल 2021 रोजी आदेश पारित करण्यात आले आहेत. या आदेशांमधील पशुसंवर्धन विभागाशी निगडीत असलेल्या बाबींची अंमलबजावणी जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाने तात्काळ सुरु केल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुभाष म्हस्के यांनी कळविले आहे.

अत्यावश्यक सेवांमध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थ (डेअरी) आणि फूड शॉपचा समावेश करण्यात आला आहे. तसेच चिकन, कोंबडया, मटन, अंडी, मासे दुकानांचाही अंतर्भाव करण्यात आला आहे. यामध्ये जनावरांसाठी आवश्यक असणारे पशु/ कुक्कुट खाद्य, चारा इ. चा देखील समावेश आहे.

स्थानिक कार्यालयाच्या मान्सून पूर्व उपक्रमांचा समावेश करण्यात आला असून यामध्ये पशुसंवर्धन विभागामार्फत नमूद काळात हाती घ्यावयाच्या लसीकरण कार्यक्रमांचा अंतर्भाव आहे.

स्थानिक कार्यालयामार्फत जनसामान्यांना पुरविण्यात येणाऱ्या सेवा समाविष्ट असून यात पशुसंवर्धन विभागाच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश होतो.

माल वाहतूक समाविष्ट करण्यात आलेली असून सर्व प्रकारच्या कार्गो सेवांचा समावेश अत्यावश्यक सेवांमध्ये करण्यात आला आहे. यामध्ये आवश्यक वस्तू व सेवांकरिता वाहतूक व पुरवठा श्रृंखला (Supply Chain) अबाधित ठेवण्यात आली आहे. यामध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस, मासे व जनावरांचा चारा या वस्तू व त्यांच्यावर प्रक्रिया करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची वाहतूक करणे व त्यांच्या साठवणुकीसाठी गोदामे चालविणे या बाबींचा अंतर्भाव होतो.

याशिवाय सर्व प्रकारचे उत्पादन उद्योग सुरु ठेवण्यात आले असून यामध्ये अन्न प्रक्रिया उद्योग, डेअरी युनिट्स, पशुखाद्य व चारा प्रक्रिया युनिट्स, औषध निर्मिती कारखाने, लस निर्मिती संस्था, वैद्यकीय उपकरणे निर्मिती युनिट्स तसेच या सर्वांना सहाय्यभूत ठरतील अशा सेवा,त्यांची वाहतूक आणि त्यांचे विक्रेते यांच्या सेवा समाविष्ट आहेत.

या सेवा उपलब्ध करीत असताना संबंधितांनी शासनाद्वारे तसेच स्थानिक प्रशासनाद्वारे  कोविड-19 विषाणूचा प्रसार खंडीत करणे अभियानांतर्गत दिलेल्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुभाष म्हस्के यांनी कळविले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज