अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित 500 रुग्णखाटांच्या रुग्णालयाकरिता 1 हजार 72 पदांची निर्मिती करण्यास शासनाची मंजूरी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकटीकरणाच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या प्रयत्नांना अभूतपूर्व यश

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.19 (जिमाका):- राज्यात वैद्यकीय पदविधारकांची संख्या जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसार कमी असल्यामुळे शासनाने वैद्यकीय शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी अलिबाग,जि.रायगड येथे 100 विद्यार्थी प्रवेश- क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नीत 500 रुग्ण खाटांचे रुग्णालय सुरु करण्यासाठी आवश्यक बांधकाम, यंत्रसामुग्री व पद निर्मितीस नुकतीच  मान्यता प्रदान केली आहे.

      जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकटीकरणाचा ध्यास घेतलेल्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या बाबीसाठी अहोरात्र केलेल्या पाठपुराव्याचे हे अभूतपूर्व असेच यश म्हणावे लागेल.

     अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याच्याशी संलग्नित 500 रुग्णखाटांच्या रुग्णालयाकरिता पुढील चार वर्षात एकूण 1 हजार 72 पदांची निर्मिती करण्यास तसेच त्याकरिता येणाऱ्या रु.61.68 कोटी इतक्या अंदाजित खर्चास वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने मंजूरी दिली आहे.

      अलिबाग येथील नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी यापूर्वी शासनाने मंत्रीमंडळ बैठकीत देण्यात आलेल्या मान्यतेनुसार आवश्यक पदनिर्मिती करण्यास उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेची अटही शिथील करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित 500 खाटांच्या रुग्णालयासाठी वर्षनिहाय व पदनामनिहाय पदनिर्मिती आवश्यक असल्यामुळे अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील 500 खाटांच्या रुग्णालयाकरिता नियमित 496 पदे त्याचप्रमाणे गट-क ची 99 काल्पनिक पदे आणि गट-ड ची 477 कंत्राटी पदे बाह्ययंत्रणेद्वारे, अशी एकूण 1 हजार 72 पदे 4 टप्प्यात निर्माण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

   पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचा जो ध्यास घेतला आहे, त्या दृष्टीने त्यांचे सुरू असलेले प्रयत्न पाहता  रायगडकरांना विविध स्तरावरील आरोग्य यंत्रणा येणाऱ्या काळात अद्ययावत होताना निश्चित दिसणार, यात शंकाच नाही.

००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज