जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जिल्हास्तरीय योजनांना स्वतंत्र लेखाशिर्ष मिळविण्यात पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांना यश नियोजन विभागाने जिल्हास्तरीय योजनांसाठी नवीन लेखाशीर्ष उघडण्यास दिली मान्यता
अलिबाग,जि.रायगड,
दि.16 (जिमाका):- जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्याच्या विविध विकास कामांना मूर्त
स्वरूप देण्याचे काम केले जाते. मात्र काही जिल्हास्तरीय योजनांसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष
उपलब्ध नसल्याने या योजनांचे काम गतीने पूर्ण करण्यात तसेच या जिल्हास्तरीय योजनांसाठी
शासन स्तरावरून निधी देण्यातही तांत्रिक अडचणी उद्भवतात.
या बाबींचा सखोल अभ्यास करुन पालकमंत्री कु.आदिती
तटकरे यांनी वित्त व नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा प्रश्न कायमस्वरूपी
सोडविला आहे. आता रायगड जिल्ह्यातील जिल्हास्तरीय योजनांसाठी नियोजन विभागाने प्राथमिक
शाळेच्या इमारत बांधकामासाठी जिल्हा परिषदेला अनुदान, प्राथमिक आरोग्य केंद्र/उपकेंद्राची
देखभाल व दुरुस्ती, वन्य प्राण्यांनी केलेल्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना नुकसान
भरपाई, शासकीय निवासी इमारती, ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम व विस्तारीकरण करणे, शासकीय
रुग्णालयांकरिता यंत्र सामुग्री व साधन सामुग्री खरेदी या जिल्हास्तरीय योजनांसाठी
नवीन लेखाशीर्ष उघडण्यास शासनाची मान्यता मिळाली आहे.
पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या निर्देशानुसार
याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य सचिव या नात्याने जिल्हाधिकारी
निधी चौधरी यांनी शासनाकडे पाठविला होता. या जिल्हास्तरीय योजनांना स्वतंत्र लेखाशिर्ष
मिळाल्यामुळे जिल्ह्यातील विकास कामांना निश्चितच गती मिळणार आहे.
0000000
Comments
Post a Comment