ई.टी.एस.मशीनमुळे जमीन मोजणी होणार जलद ! माणगाव येथील कार्यक्रमात पालकमंत्री कु.आदिती तटकरेंनी व्यक्त केला विश्वास

 


अलिबाग,जि.रायगड,दि.19 (जिमाका):- जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयाकडून जमिनी मोजण्याची पद्धत खूप वेळखाऊ होती. परंतु आता ई.टी.एस. मशीन प्रत्येक तालुक्यात उपलब्ध होत असल्यामुळे प्रत्येक तालुक्यातील जमीन मोजणीचे काम आता जलद गतीने होणार असल्याची माहिती  पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी माणगाव येथील प्रशासकीय भवन सभागृहात आज (दि.19 जून)रोजी आयोजित कार्यक्रमात दिली.

            माणगाव येथे प्रशासकीय भवनातील सभागृहात पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते तसेच महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्याधुनिक जमीन मोजणी यंत्र ई.टी.एस.मशीन वितरण सोहळा संपन्न झाला.

             यावेळी जिल्हा भूमीलेख अधीक्षक चारुशीला चव्हाण, प्रांताधिकारी प्रशाली जाधव- दिघावकर, तहसिलदार प्रियंका आयरे-कांबळे, पोलीस निरीक्षक श्री. अश्वनाथ खेडकर,सुभाष केकाणे, माजी सभापती संगिता बक्कम, माजी नगराध्यक्ष योगिता चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, संदिप खरंगटे, नगरसेवक जयंत बोडेरे, श्रीमती श्रद्धा यादव, महसूल तसेच भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी- कर्मचारी, स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

            या प्रसंगी पालकमंत्री कु. आदिती तटकरे म्हणाल्या की, भूमी अभिलेख कार्यालयामार्फत विविध तालुक्यात जमीन मोजण्याचे काम वेगळ्या पद्धतीने सुरू होते. आता डिजिटल युग सुरू असून प्रत्येक कार्यालयातील माहिती संगणकाद्वारे एकत्रित करून ठेवली जाते. रायगड जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. मुंबई - गोवा महामार्गाचे काम, दिघी बंदराचे काम  वेगाने सुरू आहे. तसेच पर्यटनाच्या दृष्टीनेही रायगड जिल्ह्याकडे पाहिले जाते. याकरिता शासन जलदगतीने विकासकामे करीत आहे. राज्य शासनाच्या सहकार्याने आपण विविध विकास योजना जिल्ह्यात आणल्या आहेत, अजून आणीत आहोत. म्हणून मागणी केल्याप्रमाणे जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयाकरिता जमीन मोजण्याचे अत्याधुनिक मशीन प्रत्येक तालुक्यातील अधिकारी यांच्याकडे देण्यात आल्या आहेत. या मशीनमुळे यापुढे जमीन मोजणीची कामे जलदगतीने होणार असल्याने वेळेचीही बचत होईल.

             त्या पुढे म्हणाल्या की, आपण एकामागे एक अशा दोन वादळांना सामोरे गेलो आहोत. जमिनीच्या नोंदी ठेवल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील सर्व शासकीय जमिनींची यापुढे मोजणी करून संरक्षण भिंती बांधण्याचे नियोजन आहे. भूमी अभिलेख कार्यालयात चाळीस कर्मचारी कमी असूनदेखील जिल्ह्यात या विभागाचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे.

             आमदार भरतशेठ गोगावले म्हणाले की, विविध कारणांमुळे सामान्य माणसांना जमीन मोजून घेण्यासाठी खूप वेळ लागत होता. परंतु आता ई. टी.एस. मशीनमुळे जमीन मोजणीचे काम फक्त 15 ते 20 मिनिटांत पूर्ण होईल. पूर्वी जमीन मोजायची असेल तर दोन तीन महिन्यांनी नंबर लागत होता. परंतु आता मोजणीच्या आधुनिक पद्धतीमुळे कामे सोपी होणार आहेत.

    40 डॉक्टरांना त्यांनी चांगले काम केले म्हणून सन्मानित केल्यामुळे त्यांची कुणीतरी दखल घेतली आहे. याचे मानसिक समाधान  डॉक्टरांना निश्चितच मिळाले असेल, असे सांगून त्यांनी करोना संकटकाळात उत्तम सेवा दिलेल्या आरोग्य यंत्रणेच्या सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

    जिल्ह्यातील तालुक्याच्या भूमी अभिलेख कार्यालयासाठी देण्यात आलेल्या या ई.टी.एस मशीनमुळे जमीन मोजणीचे काम अत्यंत कमी वेळेत व अचूकपणे करता येणार असून नागरिकांची होणारी गैरसोय दूर होईल. संपूर्ण राज्यात रायगड जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाचे कामकाज प्रथम क्रमांकावर आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख श्रीमती चारुशीला चव्हाण यांनी यावेळी दिली.  

                जिल्ह्यातील 9 तालुक्यातील अलिबाग - प्रदीप जगताप, पेण -सुधीर जाधव, पनवेल- विजय भालेराव, उरण- गणेश राठोड, कर्जत- इंद्रसेन लांडे, सुधागड- काशिनाथ मोरे, माणगाव- नरेंद्र आंबरे, मुरुड- योगेश कातडे, पोलादपूर- पंढरीनाथ चौधरी या भूमी अभिलेख उपअधीक्षक अधिकाऱ्यांकडे हे ई.टी.एस मशीन सुपूर्द करण्यात आले.

             यावेळी करोना काळात उत्तम सेवा दिलेल्या डॉक्टरांना "करोना योद्धा" म्हणून गौरविण्यात आले. समानार्थी डॉक्टर्स एकूण 40 होते, मात्र प्रातिनिधिक स्वरूपात डॉ.गौतम राऊत, डॉ.अजय मेहता, डॉ. आबासाहेब पाटणकर, डॉ.संजय माळी, डॉ. जगदीश बेडेकर, डॉ.आशिष जाधव, डॉ. अमित मेहता, डॉ.अभिजित पाटसकर या डॉक्टर्सना सन्मानपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक