मुरुड नगरपरिषद क्षेत्रात अत्याधुनिक फिरत्या दवाखान्याद्वारे क्षयरोग चाचणी शिबिर संपन्न

 

 

अलिबाग, जि.रायगड,दि.8 (जिमाका) :- भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान संस्थान ( ICMR ) व जागतिक आरोग्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच मुरुड-जंजिरा येथे क्षयरोग तपासणी शिबीर संपन्न झाले. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान व साधन सामुग्री सोबत घेऊन सर्व सुविधायुक्त फिरता दवाखाना कार्यरत आहे. या शिबिरात रुग्णांची मधुमेह व हिमोग्लोबिन चाचणी, डिजिटल एक्स-रे, थुंकी नमुना तपासणीसाठी CBNAAT ही उच्च दर्जाची चाचणी, वजन व उंची अशी संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली.

आतापर्यंत एकूण 157 जणांनी या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला. या मोहिमेंतर्गत जवळपास एक हजार जणांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. याचा उपयोग भारतातील क्षयरोगांची स्थिती समजण्यास व त्यांचा अभ्यास करण्यासाठी होणार आहे. यातील माहितीच्या आधारे क्षयरोगासंदर्भातील धोरण निश्चित करण्यासाठी शासनास मदत होणार आहे.

या शिबिराच्या व्यवस्थापनासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश अंधळकर, डॉ. शबाना खान, सामाजिक कार्यकर्ते श्री. राकेश गायकवाड, आरोग्य सेवक श्री.सागर रोकडे व इतर कर्मचारी असे जवळपास 20 वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत.  

मुरुड नगरपरिषद येथे सुरू असलेल्या या शिबिरास जिल्हा पी.पी.एम.समन्वयक श्री. एस.जी.दंतराव यांनी नुकतीच भेट देऊन या वैद्यकीय पथकाच्या कामाचे कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज