कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असल्याने नागरिकांना दक्ष राहण्याचे जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांचे आवाहन
अलिबाग,जि.रायगड,दि.8 (जिमाका):- केंद्र
व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुढील काही दिवसात कोविड-19 च्या तिसऱ्या
लाटेची शक्यता वर्तविली जात आहे.
रायगड जिल्ह्याचा सध्याचा पॉझिटिव्हिटी रेट
दहा टक्क्यांपेक्षा खाली आहे . परंतु कोविड-19 निर्देशांचे पालन न केल्यास हा पॉझिटिव्हीटी
दर वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे, बाजारपेठांमध्ये गर्दी
करणे, अनावश्यक बाहेर पडणे, मास्क न वापरणे यामुळे जिल्हयातील रुग्णांची संख्या वाढू
शकते, ती वाढू नये,यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या वतीने कोविड-19 नियमांचे
उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे.
या कारवाईमध्ये 1 एप्रिल 2021 ते 30 जून
2021 या कालावधीत पोलिस प्रशासनाकडून रक्कम रुपये 1 कोटी 32 लाख व ग्रामपंचायत तसेच
नगरपालिका यासारख्या स्थानिक प्रशासनाकडून रु.21 लाख 56 हजार 450 अशी एकूण रु.1 कोटी 53 लाख 56 हजार 450 एवढी दंडात्मक
रक्कम वसूल करण्यात आली आहे.
तसेच पुढील काही दिवसात कोविड-19 च्या तिसऱ्या
लाटेची शक्यता वर्तविली जात असल्याने नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये तसेच
अनावश्यक कारणासाठी बाहेर पडण्यात येऊ नये, बाहेर पडताना मास्कचा वापर करण्यात यावा,
नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर आपत्ती व्यवस्था कायदा 2005 व भा.द.वि. 1860 प्रमाणे
कार्यवाही करण्यात येईल, त्यामुळे नागरिकांनी दक्ष रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती
निधी चौधरी यांनी केले आहे.
000000
Comments
Post a Comment