राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली महाड येथील दरडग्रस्त तळीये गावाची पाहणी पुष्पचक्र अर्पण करून मृतांना वाहिली श्रध्दांजली

 



अलिबाग,जि.रायगड,दि.27 (जिमाका):- महाड तालुक्यातील तळीये गावातील झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी घटना आहे.   या घटनेमध्ये सर्व परिवार मृत पावले आहेत, यामुळे आम्ही सर्व दुःखी आहोत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे, या शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (दि.27 जुलै) रोजी महाड मधील तळीये या गावी शोक व्यक्त केला आहे.

             राज्यपाल श्री.कोश्यारी आज महाड तालुक्यातील तळीये या दरडग्रस्त गावाची पाहणी करण्याकरिता आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

             यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार आशिष शेलार,जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी महाड निलेश तांबे, महाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, महाड तहसिलदार सुरेश काशीद, सुधागड तहसिलदार दिलीप रायण्णावर,तळा तहसिलदार अण्णाप्पा कनशेट्टी, तळीये गावाचे सरपंच, दुर्घटनेतील मृत पावलेल्या ग्रामस्थांचे नातेवाईक आदी उपस्थित होते.

             राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री श्री.उध्दव ठाकरे यांनी देखील या ठिकाणी भेट दिली आहे. जे घडले आहे ते नीट करणे कठीण असले तरी सुदैवाने या दुर्घटनेतून वाचलेल्या नागरिकांचे केंद्र सरकार, राज्य सरकारमार्फत  पुनर्वसन करण्याचे व त्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा एकत्रित प्रयत्न केंद्र व राज्य शासन करील.

              या ठिकाणी मृत झालेल्या व्यक्तींना मी मनापासून श्रध्दांजली अर्पण करीत असून ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो,

तुम्ही सर्वांनी सकारात्मकरित्या एकत्र येत काम केल्यास लवकरात लवकर उपाय करण्यासाठी सहकार्य मिळेल, असेही ते यावेळी म्हणाले.

             राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी दरडग्रस्त तळीये गावाच्या स्थळी पुष्पचक्र अर्पण करुन मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक