उजळोली पाझर तलावाच्या 2 कोटी किंमतीच्या दुरुस्ती प्रस्तावास शासनाची मान्यता मिळविण्यात पालकमंत्री कु.आदिती तटकरे यशस्वी
अलिबाग,जि.रायगड,दि.01, (जिमाका) :- खालापूर तालुक्यातील उजळोली पाझर तलावाच्या तब्बल रु.2 कोटी
61 लक्ष 8 हजार 780 इतक्या किंमतीच्या दुरुस्ती प्रस्तावास सातत्याने वैयक्तिक पाठपुरावा
करून शासनाची मान्यता मिळविण्यात पालकमंत्री कु.आदिती तटकरे यशस्वी झाल्या आहेत.
खालापूर तालुक्यातील
उजळोली येथील पाझर तलाव हे काम उजळोली गावाच्या स्थानिक नाल्यावर सन 1988 मध्ये रायगड
जिल्हा परिषद यांच्यामार्फत पूर्ण झाले होते. ही योजना ‘मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेंतर्गत
दुरुस्ती कार्यक्रम आराखड्यात प्राधान्य क्रमांक एक मध्ये आहे. या पाझर तलावाचा संकल्पित
पाणीसाठा 531.49 सघमी व मूळ सिंचन क्षमता 30.4 हेक्टर असून याच्याव दुरुस्तीनंतर
30.4 हेक्टर सिंचन क्षमता पुनर्स्थापित होणार आहे. जुलै-ऑगस्ट 2019 च्या अतिवृष्टीमुळे
या तलावाच्या दगडी बांधकामातील विहिरीजवळ गूरळ पडल्यामुळे मुख्य विमोचक, पोहोच कंड्यूट
आरसीसी पाईप व त्या बाजूच्या भरावातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याने माती
धरणास धोका होऊन फुटू नाही यासाठी धरणाच्या मजबुतीकरणासह नवीन प्रचलित पद्धतीने माती
धरणाचे नूतनीकरण होणे आवश्यक होते.
ही बाब जिल्हा परिषद
सदस्य श्री.नरेश पाटील व ग्रामस्थ यांनी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या निदर्शनास
आणून दिली. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेवून पालकमंत्री कु.तटकरे यांनी तातडीने या
पाझर तलावाच्या दुरुस्तीच्या कामाकरिता शासनाकडे पाठपुरावा सुरू केला व त्यांनी केलेल्या
सातत्यपूर्ण पाठपुराव्याअंती या पाझर तलावाच्या दुरुस्तीकरिता रु.2 कोटी 61 लक्ष 8
हजार 780 इतक्या किंमतीच्या दुरुस्ती प्रस्तावास वित्त विभाग, शासन परिपत्रक दि.10
नोव्हेंबर 2020 मधील सूचना विचारात घेऊन शासनाकडून प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात
आली आहे.
यामुळे खालापूर तालुक्यातील उजळोली येथील या पाझर
तलावाची दुरुस्ती होवून या क्षेत्रातील 30.4 हेक्टर सिंचन क्षमता पुनर्स्थापित होणार
आहे.
00000
Comments
Post a Comment