कातकरी उत्थान अभियानांतर्गत आदिवासी कातकरी बांधवांना दाखले, रेशनकार्ड वाटपाचा कार्यक्रम संपन्न

 


        अलिबाग, दि.28 (जिमाका):- शासन आणि जिल्हा प्रशासन आदिवासी समाजाच्या कायम पाठीशी असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण सर्वतोपरी प्रयत्नशील आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आज  येथे केले. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या पुढाकारातून कातकरी उत्थान अभियानांतर्गत आदिवासी कातकरी समाजातील बांधवांना दाखले, रेशनकार्ड वाटपाचा कार्यक्रम कोविड नियमांचे पालन करीत आज ग्रामपंचायत हॉल कुरुळ अलिबाग सभागृह येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.  

यावेळी उपविभागीय अधिकारी अलिबाग प्रशांत ढगे, तहसिलदार श्रीमती मीनल दळवी  तसेच अलिबाग, नागाव, चौल, रामराज, पोयनाड, चरी, कामार्ले, किहीम, सारळ या मंडळातील मंडळ अधिकारी उपस्थित होते.

             यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर म्हणाले की, स्थानिक तरुणांनी प्रशासकीय सेवेमध्ये येण्याकरिता गरुड झेप फाऊंडेशन तर्फे घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे. कोविड-19 चे संकट अजून टळले नसून  आदिवासी बांधवांपैकी ज्या आदिवासी बांधवांचे लसीकरण झाले नाही, अशा आदिवासी बांधवांनी लसीकरण करून घ्यावे.  या कार्यक्रमाप्रसंगी 78 आदिवासी बांधवांना जातीचे दाखले देण्यात आले, त्याचबरोबर 17 आदिवासी बांधवांना शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले. आरोग्यवर्धीनी केंद्र, कुरूळ, अलिबाग येथे उपस्थित 12 आदिवासी बांधवांना पहिल्या व दुसऱ्या डोस देऊन लसीकरण करण्यात आले. त्याचबरोबर 10 आदिवासी बांधवांचे नवीन शिधापत्रिका मिळण्याकरिता अर्ज भरून घेण्यात आले.

उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे यांनी सांगितले की, जो पर्यंत शेवटच्या आदिवासी बांधवांपर्यंत आपण पोहोचत नाही, तो पर्यंत आदिवासी उत्थान अभियान यशस्वी होणार नाही, त्याकरिता सर्व मंडळ अधिकारी, तलाठी यांनी आदिवासी बांधवांना शक्य ती मदत करावी, त्यांच्या सुखदुःखाच्या प्रसंगी उपस्थित राहावे असे सांगून कार्यक्रमाची सांगता केली.

तहलिसदार मिनल दळवी यांनीही आपले मनोगत व्यक्त करुन कोविड-19 चा प्रादूर्भाव रोखण्याकरिता लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगून आदिवासी युवक-युवतींनी  प्रशिक्षणाचा लाभ घेण्याकरिता आवाहन केले.

आदिवासी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भगवान नाईक यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

0000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज