मुंबई विभागीय युवा महोत्सवाचा निकाल घोषित रायगडने लोकनृत्यात पहिला तर लोकगीतात पटकाविला दुसरा क्रमांक

 


 

            अलिबाग, दि.5 (जिमाका):- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, अंतर्गत उपसंचालक क्रीडा व युवक सेवा मुंबई विभाग तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड यांच्यावतीने युवांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी 15 ते 29 वयोगटातील युवक- युवतींसाठी दि.04 जानेवारी 2022 रोजी मुंबई विभागीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात रायगड जिल्ह्याने लोकनृत्यात पहिला तर लोकगीतात दुसरा क्रमांक पटकाविला.

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या सूचनेप्रमाणे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन आले. या युवा महोत्सवामध्ये लोकगीत व लोकनृत्य या प्रकारांचा फक्त समावेश करण्यात आला होता.  युवा महोत्सवांमध्ये मुंबई विभागातील ठाणे, पालघर, रायगड, मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

 या स्पर्धेचे उद्घाटन रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहभागी स्पर्धकांना मार्गदर्शन करताना आदिती तटकरे यांनी शुभेच्छा दिल्या व युवा महोत्सवांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांनी आपल्या कलेचे प्रदर्शन करून या स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळवावे तसेच राज्यस्तरीय युवा महोत्सव मध्ये मुंबई विभागाला नावलौकिक मिळवून द्यावा, असे आवाहनही केले.

युवा महोत्सवाचा निकाल पुढीलप्रमाणे आहे.  1) लोकगीत - प्रथम - पालघर जिल्हा, द्वितीय रायगड जिल्हा आणि तृतीय मुंबई शहर जिल्हा   2) लोकनृत्य - प्रथम - रायगड जिल्हा, द्वितीय पालघर जिल्हा आणि तृतीय मुंबई शहर जिल्हा, यासर्व  विजेत्या स्पर्धकांचे पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे व जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.रविंद्र नाईक यांनी अभिनंदन केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या महोत्सवाच्या आयेाजनासाठी रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व मुंबई शहर येथील सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

मुंबई विभागीय युवा महोत्सव लोकगीत आणि लोकनृत्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्रीमती पुष्पा ताई पागधरे (लता मंगेशकर पुरस्कार प्राप्त गायिका..), श्रीमती ग्लोरिया डिसुझा (सुप्रसिद्ध अभिनेत्री, केंद्र शासनाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर कलाश्री राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त), श्री नंदकिशोर मसुरकर (सुप्रसिद्ध अभिनेते, केंद्र शासनाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर कलाश्री राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त) हे होते

            या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी केले. या महोत्सवाच्या उद्धाटन प्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनीही स्पर्धकांना मार्गदर्शन केले. खरा कलाकार हा संवेदनशील असतोच. या युवा महोत्सवामध्ये सहभागी होणारे स्पर्धक हे उत्तम कलाकार आहेतच त्याचबरोबर त्यांनी संवेदनशीलताही जपावी व भविष्यात चांगली व विधायक कामे करुन देशाची व समाजाची सेवा करावी, असे आवाहन त्यांनी स्पर्धकांना केले. यावेळी रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी श्रीम.तपस्वी गोंधळी यांनीही स्पर्धकांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.  

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक