सारळ डाक विभागातील निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या निवारणासाठी पेन्शन डाक अदालतचे 18 मार्च ला आयोजन

अलिबाग, दि.23 (जिमाका):- डाक विभागाच्या कुटुंब निवृतीवेतनधारक व निवृत्ती वेतनधारकाच्या समस्या सोडवण्यासाठी पोस्टमास्टर जनरल, नवी मुंबई रिजन यांच्याद्वारे पेन्शन अदालत शुक्रवार, दि.18 मार्च रोजी दुपारी 12.00 वाजता पोस्ट मास्टर जनरल, नवी मुंबई रिजन कार्यालय, 2 रा मजला, पनवेल मुख्य पोस्ट ऑफिस इमारत, पनवेल, रायगड येथे आयोजित करण्यात आली आहे.

कोविड-19 महामारीच्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे वयोमानाप्रमाणे स्वत:ची काळजी घेऊन पेन्शन अदालतीला प्रत्यक्ष उपस्थित राहणे टाळावे. यामध्ये निवृत्तीधारकांच्या वेतन व इतर लाभाशी संबधित तक्रारी तसेच जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत, ज्यांचा सेवेत असताना मृत्यू झाला आहे, ज्यांना तीन महिन्याच्या आत निवृतीवेतनाची पूर्तता झालेली नाही अशा प्रकरणाचा या डाक अदालतीमध्ये निपटारा करण्यात येणार आहे.

तसेच न्यायालयात असणारी, कायदेशीर प्रलंबित असणारी प्रकरणे या अदालतीमध्ये समाविष्ट करता येऊ शकत नाहीत. त्याचप्रमाणे पेन्शनर असोसिएशनकडून आलेल्या प्रकरणावरही या अदालतीमध्ये निर्णय घेता येत नाही. अशी माहिती पोस्ट विभागाकडून देण्यात आली आहे.

तक्रारदाराने अर्ज करताना निवृत्तीधारकाचे नाव, हुद्दा, जिथे निवृत्त झाले त्या कार्यालयाचे नाव, निवृतीची तारीख, पीपीओ क्रमांक, जिथून पेन्शन घेतली जात आहे त्या पोस्ट ऑफिसचे नाव, पोस्टाचा पत्त्ता, दूरध्वनी क्रमांक, थोडक्यात तक्रार, पेन्शनकर्त्याची सही, दिनांक अशा पद्धतीने अर्ज करावा.

पोस्ट मास्टर जनरल, नवी मुंबई रिजन कार्यालय यांच्याकडून अशी अदालत प्रति वर्षी आयोजित केली जाते. या पेन्शन अदालतीचा हेतू पेन्शनधारकांच्या समस्या वेगवान व प्रभावी रीतीने विनाविलंब सोडविणे, हा आहे. या डाक अदालतीमधून डाक विभागाच्या निवृत्ती वेतनधारकांच्या समस्यांवर, तक्रारींवर तात्काळ निर्णय घेऊन तोडगा काढण्याला प्राधान्य दिले जाणार आहे.

तक्रारदारांनी आपला अर्ज वर दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठ लेखा अधिकारी, पोस्ट मास्टर जनरल, नवी मुंबई रिजन कार्यालय, 2 रा मजला, पनवेल मुख्य पोस्ट ऑफिस इमारत, पनवेल, रायगड - 410206 या पत्त्यावर दि.28 फेब्रुवारी पर्यंत मिळतील, अशा रीतीने पाठवावेत. त्यानंतर आलेल्या प्रकरणाचा अंतर्भाव या डाक अदालतीमध्ये केला जाणार नाही. संबधित गरजू व्यक्तींनी या अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रायगड जिल्हा डाक अधीक्षक श्री.अविनाश पाखरे यांनी केले आहे. 

 

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज