तृतीयपंथी ओळख दिनानिमित्त मतदार नोंदणीची विशेष शिबिरे; जिल्ह्यात दि.27 मार्च ते दि.10 एप्रिल 2022 या कालावधीत होणार विशेष शिबिरांचे आयोजन


अलिबाग,दि.29 (जिमाका):- दि.31 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत तृतीयपंथियांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर या जिल्ह्यात दि.27 मार्च ते दि.10 एप्रिल 2022 या कालावधीत तर उर्वरीत महाराष्ट्रात दि.27 मार्च ते दि.02 एप्रिल या कालावधीत ही नोंदणी शिबिरे राबविली जाणार आहेत.

तृतीयपंथियांकडे मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची असलेली कमतरता लक्षात घेऊन भारत निवडणूक आयोगाने त्यांना कागदपत्रांबाबत सवलत देऊ केली आहे. वय वर्ष 18 ते 21 वयोगटातील ज्या तृतीयपंथी व्यक्तीकडे वयाचा कोणताही पुरावा नसेल, तर त्यांच्या गुरु माँ ने दिलेले प्रमाणपत्रही पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. तसेच 21 वर्षावरील तृतीयपंथियाने वयाचा पुरावा म्हणून स्वतःचे वय सिद्ध करणारे प्रमाणपत्र दिल्यास अधिकृत मानले जाते. पत्त्याचा पुरावा म्हणून संबंधीत व्यक्तीच्या सध्याच्या निवासस्थानी आलेले टपालसुध्दा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. या कागदपत्रांनुसार नोव्हेंबर 2021 मध्ये झालेल्या विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रमांतर्गत म्हणजे मतदार नोंदणीच्या मोहिमेमध्ये राज्यभरातून मोठया प्रमाणात तृतीयपंथियांची नोंदणी करून घेण्यात आली होती.

महाराष्ट्रातील सर्व पात्र तृतीयपंथीय नागरिकांची मतदार यादीत नोंदणी करणे, हे मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाचे उद्दिष्ट आहे. तेव्हा यंदाच्या तृतीयपंथी ओळख दिनाच्या निमित्ताने तृतीयपंथियांसाठी कार्यरत सामाजिक संस्थांनी आणि व्यक्तींनी या मोहिमेला सहकार्य करुन अधिकाधिक तृतीयपंथियांनी या विशेष सप्ताहात मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे. जिल्हयातील ज्या विधानसभा मतदारसंघात तृतीयपंथियांच्या मोठ्या प्रमाणात वसाहती आहेत, अशा ठिकाणी मतदार नोंदणीची शिबिरे आयोजित केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक